हाडं ठणकत असल्याची तक्रार महिलांमध्ये सातत्याने दिसून येते. यामागे वेगवेगळी कारणे असली तरी आहारातून मिळणारे अपुरे पोषण आणि त्यामुळे शरीरात असणारी विविध घटकांची कमतरता ही मुख्य कारणे असल्याचे दिसते. कॅल्शियम, डी व्हिटॅमिन, हिमोग्लोबिन किंवा इतरही काही घटक कमी असल्याने हाडांचे दुखणे सुरू होते. सततची धावपळ आणि कामाचा ताण यामध्ये आपण अनेकदा स्वत:कडे पुरेसे लक्ष देत नाही. मात्र त्यामुळे सुरुवातीला लहान वाटणारे त्रास नंतर गंभीर रुप धारण करतात. हाडं ठणकायला लागली की काय करावं कळत नाही. कमी वयात होणारा हाडांचा ठिसूळपणा किंवा हाडांमध्य़े नसलेली ताकद ही यामागील मुख्य कारणे असतात. ही हाडांची दुखणी आपण टाळू शकतो. (3 Best Foods for Bone pain) त्यासाठी आहारात नियमितपणे काही गोष्टींचा समावेश करायला हवा. पाहूयात हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात असायलाच हव्यात अशा ३ गोष्टी कोणत्या...
१. दूध
दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असते. एक कप दुधात ३०० मिलीग्रॅम कॅल्शियम असतो. इतकेच नाही तर आपण दिवसभरात जितके व्हिटॅमिन डी घेतो त्यातील १५ टक्के हे दुधातून मिळते. तर आपल्या रोजच्या गरजेतील १० टक्के पोटॅशियम दुधातून मिळते. १९ ते ५० वर्षे वयाच्या व्यक्तींना दिवसाला १००० ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. वय वाढत जाते त्याप्रमाणे हाडांची घनता कमी होत जाते आणि हाडे ठणकतात. पण आहारात नियमितपणे दूधाचा समावेश केल्यास कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते. यासोबतच शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी चीही आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियम शरीरात शोषले न गेल्यानेही हाडांचे दुखणे उद्भवते.
२. चीज
चीज हेही दूधापासूनच बनवलेले असल्याने त्यातही कॅल्शियमचे प्रमाण अतिशय चांगले असते. याशिवाय चीजमध्ये स्निग्ध पदार्थ, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-१२ अशा सगळ्याच घटकांचे प्रमाण चांगले असल्याने हाडे दुखत असतील तर चीजचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. मेंदूचा विकास होण्यासाठी, शरीराचे कार्य चांगले होण्यासाठी चीज खाणे अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे चीज पराठा, चीज बॉल्स, चीज सँडविच किंवा एखाद्या पदार्थावर किसलेले चीज घेऊन आपण आहारात चीजचा नक्की समावेश करु शकतो.
३. योगर्ट
योगर्ट हा आपल्याला काहीतरी मॉडर्न पदार्थ वाटत असला तरी तो दह्यासारखाच लागतो. यातून शरीराला जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे योगर्टचा हाडांच्या बळकटीसाठी आहारात आवर्जून समावेश करायला हवा. हे दुधापासूनच तयार झालेले असल्याने दुधातून मिळणारे सर्व पोषण आपल्याला यातून सहज मिळते. १२ आठवडे ठराविक व्ययाम करुन नियमितपणे योगर्ट खाल्ल्यास हाडांची घनता चांगल्यारितीने वाढते याबाबतचे एक संशोधन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. योगर्टमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स मिळत असल्याने तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लेवर नक्की ट्राय करु शकता. सलाडमध्ये घालण्यासाठीही योगर्टचा वापर केला जातो.