Join us

Gardening Tips : सुकलेल्या तुळशीला नेहमी हिरवीगार ठेवण्यासाठी 'या' टिप्स वापरा; वर्षानुवर्ष खराब होणार नाही रोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 12:20 IST

Gardening Tips : तुळशीच्या रोपाशी लोकांचा विश्वास जोडलेला आहे.  म्हणून तुम्ही या वनस्पतीची पूजा नक्कीच करा. पण तुळशीची पानं तोडण्याचा प्रयत्न करु नका.

ठळक मुद्देजेव्हा काही लोकांचे तुळशीचे रोप पावसाळ्यातही टिकू शकत नाही, तेव्हा त्यांचे सर्व अंदाज चुकतात. कारण तुळशीच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही.

तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे.  आयुर्वेदातही तुळशीच्या औषधी गुणधर्मांबाबत सांगितले आहे. कोणी धर्म, श्रद्धा म्हणून तर कोणी आरोग्यविषयक कारणांसाठी घरात तुळस ठेवतो. प्रत्येक घरात एक तरी तुळस असतेच. पण तुळशीबाबत अनेकांची तक्रार असते की तुळस खूप लवकर सुकते. अनेकदा व्यवस्थित पाणी घालूनही तुळशीची पानं गळतात.  तुळशीचं झाड सुकण्याची अनेक कारणे असू शकतात. यासंदर्भात बांदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर आनंद सिंह यांनी हर जिंदगीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 

डॉ आनंद सिंह म्हणतात, ''उष्णता, गरमीमुळे तुळशीचे झाड सुकते असा अनेकांचा अंदाज आहे, तर एखाद्याला वाटते की तुळशीचे झाड हिवाळ्यात दवांमुळे खराब होते. पण जेव्हा काही लोकांचे तुळशीचे रोप पावसाळ्यातही टिकू शकत नाही, तेव्हा त्यांचे सर्व अंदाज चुकतात. कारण तुळशीच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही. एक प्रकारे, असे म्हणता येईल की तुळशीच्या झाडाला जास्त काळजीची गरज नाही, कारण ती उष्णकटिबंधीय वनस्पती आहे, त्यामुळे तुळशीची वनस्पती कमी पाण्यात, कमी सूर्यप्रकाश आणि कमी हवेमध्ये जगू शकते. पण जर ती सारखी कोरडी होऊन पानं गळत असतील तर काही उपाय करून पुन्हा हिरवेगार केले जाऊ शकते.''

सुकलेल्या  तुळशीच्या पानांसाठी कडुलिंब फायदेशीर

जर तुमच्या घरचे तुळशीचे रोप पूर्णपणे सुकले असेल आणि तुम्हाला ते पुन्हा हिरवे दिसावे असे वाटत असेल, तर डॉ आनंद सिंह म्हणतात, ''दर महिन्याला फक्त 2 चमचे कडुलिंबाची पावडर वापरा. तुळस सुकल्यानंतर कडुलिंबाची पावडर टाकली की तुळशीच्या लागवडीनंतर नवीन पाने देखील रोपामध्ये येऊ लागतील आणि वनस्पती सुकणार नाही. हे करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला कडुनिंबाच्या पानांची पावडर झाडाच्या मातीमध्ये चांगले मिसळावी लागेल. असे केल्याने तुळशीच्या रोपाला बराच फायदा होईल.''

ऑक्सिजन खूप गरजेचा

पावसाळ्यात जेव्हा तुळशीच्या रोपामध्ये जास्त पाणी जमा होते, तेव्हा पाने गळू लागतात. याचे कारण झाडाला आवश्यकतेपेक्षा जास्त ओलावा मिळत आहे. अशा स्थितीत झाडाची मुळे श्वास घेऊ शकत नाहीत आणि परिस्थिती अशी येते की हळूहळू तुळस सुकू लागते. डॉक्टर आनंद सिंह यावर एक सोपा उपाय सुचवतात. ते म्हणतात, ''वनस्पतीपासून 20 सेंटीमीटर खालपर्यंत माती खणून काढा. म्हणजे तुम्हाला कळेल की जमिनीत ओलावा आहे की नाही. तसे असल्यास, ती कोरडी माती आणि वाळूने भरा पुन्हा कुंडी भरा. यामुळे झाडाची मुळे पुन्हा श्वास घेऊ शकतील.''

बुरशी दूर करायला हवी

जर जास्त आर्द्रतेमुळे तुळशीच्या रोपामध्ये बुरशीचे संक्रमण झाले असेल तर ही समस्या दूर करणे देखील आवश्यक आहे. यासाठी डॉ उपाय सांगतात, ''तुम्हाला बाजारात नीम खली पावडर सहज मिळेल. याला कडुलिंबाच्या बियांची पावडर असेही म्हणतात. जर तुम्ही 15 ग्रॅम पावडर जमिनीत मिसळली तर बुरशीजन्य संसर्ग निघून जातो. जर तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही घरी कडुलिंबाची पानं पाण्यात उकळवू शकता. पाणी हिरवे झाल्यावर ते थंड करून बाटलीत भरा. आता प्रत्येक 15 दिवसात एकदा तुम्ही फावड्याच्या मदतीनं माती खोदून त्यात 2 चमचे हे पाणी घाला.

तुळशीचं झाड आणि धर्म- श्रद्धा

तुळशीच्या रोपाशी लोकांचा विश्वास जोडलेला आहे.  म्हणून तुम्ही या वनस्पतीची पूजा नक्कीच करा. पण तुळशीची पानं तोडण्याचा प्रयत्न करु नका. जर दिवा किंवा धूप लावत असला तर या गोष्टी तुळशीपासून लांब ठेवा. कारण धूर आणि तेलामुळे तुळशीच्या रोपाला नुकसान पोहोचू शकतं.  तुमच्या घरातलं तुळशीचं रोपटं सुकत असेल तर या उपायांचा वापर करून तुळस नेहमी चांगली ठेवता येऊ शकते. 

टॅग्स :आरोग्यघरबागकाम टिप्स