घरात विविध प्रकारच्या डाळी असतातच. त्या फार पौष्टिक आणि पोटभरीच्या असतात. त्यामुळे डाळी आहारात असायलाच हव्यात. जेवताना विविध प्रकारची भाजी आपण करतो. मात्र त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. (You love chana dal but never tried it as a sabzi? Here’s a spicy and flavorful chana dal sabzi recipe you must try)घरात भाजी नाही अशी वेळ आली की आपल्याला वाचवण्याचे काम काही रेसिपी करतात. त्यापैकीच एक म्हणजे चणाडाळीची भाजी. वरण तर आपण खातोच. एकदा ही भाजीही खाऊन पाहा.
साहित्य
चणाडाळ, तेल, लाल तिखट, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, जिरे, हळद, मीठ, धणे - जिरे पूड, पाणी
कृती
१. चणाडाळ तासभर पाण्यात भिजत ठेवायची. जास्त वेळ ठेवता आली तर आणखी उत्तम. लसणाची पेस्ट तयार करायची. तसेच कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा. कोथिंबीर निवडायची. स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे.
२. एका कढईत थोडे तेल गरम करायचे. त्यात थोडे जिरे घालायचे. जिरे तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि लसणाची पेस्टही घालायची. मस्त परतून घ्यायचे. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा. कांदा खमंग गुलाबी परतून झाल्यावर त्यात भिजवलेली चणाडाळ घालायची. चणाडाळ छान परतायची. परतताना त्यात लाल तिखट घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. थोडी हळद घाला आणि धणे - जिरे पूडही घाला. ढवळून घ्यायचे. सगळं छान एकत्र झालं की त्यात टोमॅटो घालायचा. त्याला पाणी सुटते.
३. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरजेनुसार पाणी घाला. जरा आटू द्यायचे. झाकण ठेवा आणि एक वाफ काढून घ्यायची. गरमागरम भाजी चपाती किंवा भातासोबत खा. नक्कीच आवडेल.
