अनेक जणांची सकाळी पोट साफ न होण्याची तक्रार असते. बद्धकोष्ठता, पोट जड वाटणे, गॅस किंवा अपचन यामागे बहुतेक वेळा रात्रीच्या जेवणातील सवयी कारणीभूत असतात. आपण रात्री काय खातो, किती खातो आणि कधी खातो याचा थेट परिणाम सकाळच्या पचनक्रियेवर होत असतो. त्यामुळे रात्रीचे जेवण हलके, पचायला सोपे आणि योग्य घटकांनी भरलेले असणे खूप गरजेचे आहे.
रात्रीच्या जेवणात सर्वात आधी टाळायच्या गोष्टी म्हणजे फार तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ. असे पदार्थ पचायला जड असतात आणि पचनसंस्थेला जास्त वेळ काम करायला लावतात. त्यामुळे सकाळी पोट साफ न होता जडपणा जाणवतो. मैद्याचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, पाव, जड पराठे, तळलेले पदार्थ किंवा फार चीज-बटर वापरलेले पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळावेत. गोड पदार्थ, मिठाया किंवा जास्त साखर असलेले डेझर्ट्सही रात्री खाल्ल्यास पचन मंदावते. फार थंड पेये किंवा जेवणानंतर लगेच दूध पिणेही टाळणे योग्य ठरते. दूध प्यायच्या आणि जेवणाच्यामध्ये वेळ जाऊ द्यावा.
रात्री काय खावे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जेवणात फायबरयुक्त भाज्यांचा समावेश केल्यास पोट सकाळी सहज साफ होण्यास मदत होते. दोडकं, गाजर, दुधी भोपळा, तोंडली, चाकवत अशा हलक्या आणि पचायला सोप्या भाज्या रात्रीच्या जेवणासाठी उत्तम ठरतात. भाज्या फार तेलात न परतता वाफवून किंवा कमी तेलात परतून खाव्यात. डाळींपैकी वरण, मूग डाळ किंवा मसूर डाळ कमी फोडणीत घेतल्यास पचनावर ताण येत नाही.
भाजीसोबत भात किंवा भाकरी-चपाती यांचे प्रमाणही मर्यादित ठेवावे. पॉलिश केलेल्या पांढर्या भाताऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी पचनासाठी चांगली ठरते. रात्री फार जड धान्ये किंवा जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास पोट साफ होण्यास अडथळा येऊ शकतो.
फळांचाही योग्य वापर महत्त्वाचा आहे. रात्री फार जड किंवा फार गोड फळे टाळावीत, मात्र पपई, सफरचंद, नासपाती, किवी किंवा संत्र्यासारखी फायबरयुक्त फळे योग्य प्रमाणात आणि जेवणापासून थोड्या वेळाच्या अंतराने घेतल्यास पचन सुधारते.
रात्रीचे जेवण झोपायच्या किमान दोन ते तीन तास आधी घ्यावे. जेवणानंतर लगेच झोपणे किंवा फार वेळ बसून राहणे टाळावे. थोडे चालणे, हलकी हालचाल केल्यास पचनक्रिया सुरळीत राहते. पाणी कमी पिणेही बद्धकोष्ठतेचे एक कारण असते, त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवावी. एकंदरीत पाहता, रात्री हलके, फायबरयुक्त, कमी तेलाचे आणि संतुलित जेवण घेतल्यास सकाळी पोट साफ होणे नैसर्गिकरित्या सोपे होते. योग्य भाज्या, फळे आणि साधे पदार्थ यांचा समतोल ठेवला तर औषधांशिवायही पचन निरोगी राहू शकते.
