Join us

पावसाळ्यात जुलाब होतात तर विकतचं ORS कशाला? घरी ‘असं’ झटपट तयार करा, व्हा चटकन बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:19 IST

World ORS Day 2025 : ओआरएसचं पाणी पिऊन शरीराला इलेक्ट्रोलाइट्स, ग्लूकोज आणि पाणी पुरेसं मिळतं. हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असतं. 

How To Make ORS At Home: पाणी हे जीवन आहे हे उगाच म्हटलं जात नाही. कारण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाणी किती महत्वाचं आहे, हे यावरून समजू शकता की, मनुष्याचं शरीर हे ६० ते ७० टक्के पाण्यापासून बनलेलं असतं. अशात जर शरीरात पाणी कमी झालं तर वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. याचा अनुभव कधीना कधी आपणही घेतला असेलच. शरीरात पाणी झाल्ं तर डीहायड्रेशन, जुलाब, उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे, कमजोरी जाणवणे अशा गोष्टी होतात. काही केसेसमध्ये डिहायड्रेशनमुळे व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. 

सामान्यपणे आपण पाहिलं असेल की, डिहायड्रेशन झालं असेल किंवा जुलाब लागले असतील तर ओआरएसचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांच्या घरात ओआरएसचे पॅकेट सहजपणे मिळतात. ओआरएस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन. ओआरएसचं पाणी पिऊन शरीराला इलेक्ट्रोलाइट्स, ग्लूकोज आणि पाणी पुरेसं मिळतं. हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असतं. 

दरवर्षी २९ जुलै रोजी वर्ल्ड ओआरएस डे (World ORS Day 2025) पाळला जातो. ओआरएसबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. आजारात ओआरएस सहजपणे मिळतं. पण अनेकांना हे माहीत नाही की, घरी सुद्धा आपण ओआरएस तयार करू शकतो. तेच आज आपण पाहणार आहोत.

ओआरएस काय आहे आणि कसं काम करतं?

ओआरएसचं पूर्ण अर्थ ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन असं आहे. हे पावडर पाणी, मीठ आणि ग्लूकोजचं मिश्रण असतं. याचा उद्देश शरीरात कमी झालेलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पूर्ण करणं. डायरिया, उलटी, ताप किंवा जास्त घाम गेल्यानं शरीरातील पाणी कमी होतं, जे ओआरएस पाणी पिऊन भरून निघतं.

घरी कसं बनवाल ओआरएस?

ओआरएस पाणी तयार करण्यासाठी १ लीटर स्वच्छ उकडलेलं पाणी, ६ चमचे साखर, अर्धा चमचा मीठ लागेल. हे तयार करण्यासाठी आधी एका भांड्यात १ लीटर पाणी उकडा आणि ते थंड करा. नंतर त्यात ६ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाका. साखर आणि मीठ विरघळेपर्यंत तसंच ठेवा. आपलं ओआरएस पाणी तयार आहे.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य