हिवाळा हा ऋतू शरीरासाठी पोषक असला तरी थंडीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात आहारात अशी फळं असणं गरजेचं आहे जी शरीराला ऊर्जा, उब आणि पोषण देतात. (Winter Food: 8 fruits to eat in winter - supertonic for health, cheaper than cashews! and avoid 'these' fruits..)फळांमधून मिळणारी जीवनसत्त्वं, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला आतून मजबूत ठेवतात. चला तर जाणून घेऊया, हिवाळ्यात कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत.
हिवाळ्यात सफरचंद, स्ट्रॉबेरी, आवळा, चिकू, सीताफळ, अंजीर, किवी आणि पेरु अशी फळं खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. सफरचंदात भरपूर फायबर, जीवनसत्त्व सी आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारतात आणि शरीराचं संरक्षण करतात. स्ट्रॉबेरीमध्ये फॉलिक अॅसिड जीवनसत्त्व सी असतं, जे त्वचेची सुंदरता वाढवतं आणि सर्दीपासून बचाव करतं. पपई मुळात उष्ण असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला गरज असलेली उष्णता आणि उब त्यातून मिळते. म्हणून आहारात पपई असावी.
आवळा हे हिवाळ्याचे खास सुपरफूड आहे. ते जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, केस व त्वचेसाठी उपयोगी ठरते. चिकूमध्ये नैसर्गिक साखर, कॅल्शियम आणि फायबर असल्याने ते ऊर्जा देतं आणि थंडीच्या दिवसात शरीर गरम ठेवतं. सीताफळामध्ये कर्बोदके आणि व्हिटॅमिन B6 असतं, जे शरीराची शक्ती वाढवतात. अंजीरात आयर्न आणि कॅल्शियम असल्याने रक्त आणि हाडांची ताकद वाढते.
किवी फळात व्हिटॅमिन सी, इ आणि पोटॅशियम मुबलक असतं, जे त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती दोन्ही सुधारतं. पेरुमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असतं, जे सर्दी-खोकल्यापासून बचाव करतं आणि पचन सुधारतं. ही सर्व फळं शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात आणि थंडीत आरोग्य मजबूत ठेवतात.
याउलट कलिंगड आणि खरबूज ही फळं हिवाळ्यात टाळावीत. कारण ही फळं थंड असून शरीराचं तापमान कमी करतात. थंडीच्या दिवसात अशी फळं खाल्ल्याने सर्दी, खोकला किंवा घशाचे त्रास वाढू शकतात. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने पचन मंदावते. त्यामुळे हिवाळ्यात कलिंगड आणि खरबूज खाणे टाळावे.
हिवाळ्यात योग्य फळांची निवड केली तर शरीराला नैसर्गिक उष्णता आणि पोषण मिळते. दररोज ताजी फळं खा, भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार ठेवा. त्यामुळे थंडी कितीही असली तरी शरीर तंदुरुस्त राहील आणि त्वचेचा व चेहर्याचा तेजेला वाढेल.
