Steaming vs Boiling Vegetables : बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या आपण नेहमीच आणत असतो. या भाज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. पण या भाज्या शिजवताना जास्तीत जास्त लोक एक चूक करतात किंवा असं म्हणुया की, अनेकांना भाज्या योग्यपणे शिजवण्याची पद्धतच माहीत नसते. आपण बहुतेक वेळा गाजर, बीन्स किंवा ब्रोकोलीलाही बटाट्यासारखे पाण्यात उकळतो. पण कधी विचार केलात का की त्या उकळत्या पाण्यासोबत तुमच्या शरीराला मिळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे कुठे गायब होतात?अशात भाज्या पाण्यात उकळणं फायदेशीर असतं की वाफेवर शिजवणं? हे आपण पाहुयात.
भाज्या उकडणे
भाज्या उकडताना त्या थेट गरम पाण्यात टाकल्या जातात. ही पद्धत सोपी आणि झटपट असली तरी त्यात पोषक तत्वांचे मोठे नुकसान होते.
व्हिटामिन्सचा नाश
भाज्यांमध्ये व्हिटामिन C आणि B-कॉम्प्लेक्ससारखी अनेक पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे असतात. भाज्या पाण्यात उकडल्यावर ही जीवनसत्त्वे पाण्यात मिसळतात. आणि जेव्हा आपण ते पाणी फेकून देतात, त्यामुळे भाज्यांमधील पोषक तत्व नष्ट होतात.
टेक्स्चर आणि रंग बिघडतो
भाज्या उकडताना जास्त मऊ, चिकट आणि रंगहीन होतात. त्यांची नॅचरल टेस्टही कमी होते.
वाफेवर शिजवणे
या पद्धतीत भाज्या उकळत्या पाण्याच्या वर ठेवतात. त्या थेट पाण्याच्या संपर्कात येत नाहीत.
पौष्टिक तत्व सुरक्षित राहतात
संशोधनानुसार, वाफेवर शिजवल्यास भाज्यांतील ९०% पर्यंत पोषक घटक टिकून राहतात. व्हिटामिन C आणि B नष्ट होत नाहीत.
रंग आणि टेस्टही कायम राहते
वाफेवर शिजवलेल्या भाज्या त्यांचा नैसर्गिक रंग, कुरकुरेपणा आणि चव टिकवून ठेवतात, ज्यामुळे जेवण अधिक टेस्टी होतं.
पोटासाठी हलके
या पद्धतीत तेलाचा वापर कमी असतो, त्यामुळे अन्न पचनास सोपे आणि हलके राहते. हे वजन कमी करण्याच्या प्रत्यानात असलेल्यांसाठी आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी उत्तम आहे.
कोणती पद्धत सर्वोत्तम?
जर आपला उद्देश भाज्यांमधून जास्तीत जास्त पोषक तत्व मिळवणे असेल, तर वाफेवर शिजवणे हेच सर्वोत्तम आहे. या पद्धतीत भाज्या हळूवार शिजतात आणि त्यातील पोषण, रंग व चव टिकून राहते.



