Red and Green Chili Difference : मिरचीचा योग्य वापर केल्यास कोणत्याही पदार्थाची चव अधिकच वाढते. रोज जवळपास सगळ्याच भाज्या किंवा पदार्थांमध्ये मिरचीचा वापर केला जातो. कधी लाल मिरची तर कधी हिरवी मिरची वापरली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हिरवी मिरची आणि लाल मिरची यांपैकी कोणती मिरची आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते? जर तुम्हालाही या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत नसेल, तर याचं उत्तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर आधी हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
हिरव्या मिरचीचे फायदे
हिरव्या मिरचीत भरपूर प्रमाणात व्हिटामिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हिरव्या मिरचीत असलेलं व्हिटामिन C रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतं. याशिवाय हिरवी मिरची वजन कमी करण्यासही उपयोगी ठरू शकते. हिरव्या मिरचीत असलेलं फायबर तुमच्या पचन तंत्रावर सकारात्मक परिणाम करू शकते.
लाल मिरचीचे फायदे
तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर लाल मिरचीत कॅप्सायसिन हे तत्व आढळतं. कॅप्सायसिन शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यासोबतच चरबी जाळण्यास मदत करू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिरवी मिरची असो किंवा लाल मिरची दोन्हींचे सेवन मर्यादेत करणं आवश्यक आहे. नाही तर फायदेशीर परिणामांऐवजी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
कोणती मिरची अधिक चांगली?
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन करता येतं, तर वजन कमी करण्यासाठी लाल मिरचीचा वापर उपयुक्त ठरू शकतो. पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी हिरवी किंवा लाल दोन्ही मिरचींपैकी कोणतीही मिरची खाता येते.
जर तुम्हाला पदार्थ जास्त तिखट बनवायचे असतील, तर लाल मिरची वापरा. आणि जर पदार्थ कमी तिखट हवा असेल, तर हिरव्या मिरचीचा वापर करा. मात्र लक्षात ठेवा भेसळयुक्त हिरवी किंवा लाल मिरची खरेदी करू नका, अन्यथा आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
रोज हिरवी किंवा लाल मिरची खाणे सुरक्षित आहे का?
हो, पण मर्यादेत खाल्ल्यासच फायदेशीर ठरते. जास्त मिरची खाल्ल्याने अॅसिडिटी, पोट जळजळ, गॅस आणि मूळव्याधचा त्रास वाढू शकतो.
मिरची खाण्याचे योग्य प्रमाण
- हिरवी मिरची: दिवसाला 1–2 पुरेशी
- लाल मिरची पावडर: अर्धा ते 1 चमचा
कुणी मिरची कमी खावी?
- अॅसिडिटी किंवा गॅसचा त्रास असलेले लोक
- पोटाचे अल्सर, मूळव्याध असलेले रुग्ण
- गर्भवती महिला (अति सेवन टाळावे)
मिरची खाल्ल्याने होणारे फायदे
- पचनक्रिया सुधारते
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते
- वजन कमी करण्यात मदत
- सर्दी-खोकल्यात आराम
