Iron Pan Benefits : स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये वेगवेगळ्या भांड्यांचा वापर केला जातो. स्टील, अॅल्यूमिनिअम, नॉन स्टिक भांड्यांचा वापर अधिक केला जातो. अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करावा. भारतीय किचनमध्ये लोखंडी कढईचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. लोखंडी कढईतील भाजी किंवा पदार्थ टेस्टी तर लागतातच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कढईत स्वयंपाक केल्याने शरीरात नॅचरल आयर्न मिळतं. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. पण भलेही लोखंडी कढईत पदार्थ शिजवल्याने शरीराला फायदे मिळत असतील, मात्र स्वयंपाक करताना काळजीही घेतली पाहिजे. कारण सगळ्याच गोष्टी लोखंडी कढईत शिजवणं फायदेशीर नसतं. काही अशा भाज्या आणि पदार्थ असतात जे लोखंडी कढईत शिजवणं नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून समजून घेऊया, स्वयंपाक करताना काय काळजी घ्यायची..
लोखंडी कढईत कोणत्या भाज्या?
लोखंडी कढईत हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, मेथी, वांग्याचं भरीत, पडवळ, भेंडी आणि बीन्ससारख्या भाज्या करायला हव्यात. लोखंडी कढईत या भाज्या केल्यास त्यांमध्ये आयर्न वाढतं. टेस्टही वेगळी लागते.
कोणत्या नको?
1) जास्त आंबट पदार्थ
टोमॅटोची ग्रेवी, चिंच किंवा जास्त लिंबू असलेल्या डिश लोखंडी कढईत करू नयेत. कारण आंबट पदार्थांमुळे कढईत रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते आणि चव बदलू शकते.
2) दह्याचे पदार्थ
कढी किंवा दही घालून बनवलेले पदार्थ लोखंडी कढईत बनवल्यास त्यांचा रंग आणि चव बदलू शकते. तसेच जास्त वेळ शिजवल्यास अन्न काळसर होऊ शकते.
लोखंडी कढईत स्वयंपाक करण्याचे फायदे
लोखंडी कढईत स्वयंपाक केल्याने शरीरातील आयर्नची कमतरता कमी होण्यास मदत होते.
अन्नाची चव वाढते आणि भाज्या कुरकुरीत होतात.
नॉन-स्टिक भांड्यांच्या तुलनेत लोखंडी कढई रसायनमुक्त आणि अधिक सुरक्षित मानली जाते.
म्हणूनच आरोग्यदायी आणि चविष्ट स्वयंपाकासाठी लोखंडी कढईचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
