आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये अन्न गरम करणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. आपण मायक्रोवेव्ह किंवा गॅस वापरून शिळं किंवा थंड अन्न गरम करतो. पण जर अन्न व्यवस्थित गरम केलं नाही तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. थोडी खबरदारी घेतल्यास अन्नातील पोषक घटक तसेच टिकून राहू शकतात आणि आपल्या आरोग्यालाही ते घातक ठरणार नाहीत.
योग्य भांडं निवडा
सर्वप्रथम अन्न गरम करण्यासाठी योग्य भांडं निवडा. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना नेहमी मायक्रोवेव्ह-सेफ काचेची किंवा सिरेमिक भांडी वापरा. प्लास्टिकचे कंटेनर वापरणं टाळा. विशेषतः ते मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित नाहीत, कारण ते गरम केल्यावर अन्नात हानिकारक केमिकल्स जाऊ शकतात. स्टेनलेस स्टील किंवा एल्युमिनियमची भांडी मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नयेत.
अन्न पुन्हा पुन्हा गरम करणं टाळा
वारंवार गरम केल्याने अन्नातील पोषक घटक जसं की व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन नष्ट होतात. एका वेळी जेवढं अन्न खाणार आहात तेवढंच अन्न गरम करा. उरलेलं अन्न लगेचच फ्रिजमध्ये ठेवा आणि २४-४८ तासांच्या आत वापरा. बराच काळ साठवलेले अन्न पुन्हा गरम केल्याने बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.
अन्न झाकून गरम करा
अन्न गरम करताना ते झाकून ठेवा. यामुळे अन्न समान रीतीने गरम होतं. मायक्रोवेव्ह-सेफ झाकण वापरा, परंतु वाफ बाहेर पडण्यासाठी थोडी जागा ठेवा. गॅसवर अन्न गरम करताना झाकण ठेवा, परंतु ते मध्यम आचेवर ठेवा जेणेकरून अन्न करपणार नाही.
गरम करताना काळजी घ्या
अंडी, भात आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे काही अन्नपदार्थ गरम करताना काळजी घ्या. अंड पुन्हा गरम केल्याने ते रबरासारखं होऊ शकतं, तर भातामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. हिरव्या भाज्या पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यांचे पोषक घटक नष्ट होतात.
नीट ढवळा
अन्न गरम केल्यानंतर ते नीट ढवळत राहा आणि तापमान चेक करा. तापमान बरोबर नसेल तर बॅक्टेरिया वाढतात. अन्न योग्यरित्या गरम करून तुम्ही त्याची चव तशीच ठेऊ शकता.