नाश्त्यासाठी छान पौष्टिक पदार्थांपैकी एक म्हणजे डोसा. विविध प्रकारचे डोसे करता येतात. चवीला मस्त असतात आणि करायलाही सोपे असतात. (Want to eat nutritious protein dosa? Try eating gram-chickpea dosa, nutritious food for school tiffin )हा डोसा काही पौष्टिक पदार्थांच्या मिश्रणातून करायचा आहे. त्यामुळे चविष्ट डोसा आरोग्यासाठी फायद्याचाच ठरेल. पाहा कसा करायचा पौष्टिक डोसा.
साहित्य इडली तांदूळ, हरभरा, शेंगदाणे, नाचणी, चणा डाळ, मुग डाळ, मेथीचे दाणे, काबुली चणे, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे, पाणी, मीठ, तेल
कृती१. एका खोलगट पातेल्यात वाटीभर इडली तांदूळ घ्यायचे. जर इडली तांदूळ नसतील तर साधे तांदुळही घेऊ शकता. त्यात वाटीभर हरभरे घाला. अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. वाटीभर नाचणी घालायची. अर्धी वाटी चणा डाळ घालायची. वाटीभर मूग डाळ घ्यायची. अर्धी वाटी काबुली चणे घ्यायचे. दोन चमचे मेथी दाणे घालायचे. सगळे पदार्थ स्वच्छ धुवायचे. दोन ते तीनदा पाण्यातून काढायचे. मग रात्रभर भिजत ठेवायचे.
२. दुसर्या दिवशी फुलून दुप्पट झालेले असेल. मग त्यातील पाणी काढून टाकायचे. एका मिक्सरच्या भांड्यात सगळ्या डाळींचे मिश्रण घ्यायचे. त्यात थोडे जिरे घालायचे. कांद्याचे तुकडे घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. आल्याचा लहानसा तुकडा घालायचा. त्यात थोडे गरजे पुरते पाणी घालायचे. पातळ करायचे नाही. जरा घट्टच ठेवायचे. पातळ केल्यावर डोसा कुरकुरीत होणार नाही. आणि पसरवता येणार नाही.
३. पीठ मात्र व्यवस्थित वाटून घ्यायचे. सगळे पदार्थ एकजीव करायचे त्यात तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. सगळं वाटून झाल्यावर एका खोलगट पातेल्यात पीठ काढून घ्यायचे. चवी पुरते मीठ घालायचे. पीठ छान ढवळायचे. नीट फेटून घ्यायचे. छान मऊ करायचे.
४. तव्यावर थोडे तेल घालायचे. त्यावर मस्त डोसा लावायचा आणि खसंग होऊ द्यायचा. डोसा एका बाजूने सुटला की दुसऱ्या बाजूला उलथायचा आणि डोसा दोन्ही बाजूंनी छान परतायचा. कुरकुरीत झाल्यावर काढून घ्या आणि सांबार चटणीसोबत खा.