बटाटा, वांगी असे काप चवीला जेवढे मस्त तेवढेच कच्च्या केळीचे कापही भारी असतात. करायला अगदी सोपे आहेत. तसेच चवीला फार चविष्ट असतात. भातासोबत छान लागतात तसेच भाकरीसोबतही भारी लागतात. (Veg Fish Fry - An easy way to make spicy recipe of raw banana, try it once you will love it)नक्की करुन पाहा. लहान मुलांना डब्यात दिले तर डबा नक्की फस्त होईल. या पदार्थाला व्हेज फीश फ्राय असेही म्हटले जाते. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य
कच्ची केळी, रवा, तांदूळाचे पीठ, बेसन, लसूण, आलं, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धणे-जिरे पूड, तेल
कृती
१. कच्ची केळी घ्या. धुवा त्याला जर चिकटपणा असेल तर नीट पुसून घ्या. केळी ओली राहू द्यायची नाहीत. सुकली की सुरीने त्याची साले काढायची. कच्च्या केळीची सालं फार जाड असतात. त्यामुळे सुरीनेच काढायची लागतात. सालं काढल्यावर केळीचे लांबलांब काप करायचे. जास्त पातळ काप करु नका. अगदी जाडही ठेवायचे नाहीत. मध्यम आकाराचे काप करा.
२. एका ताटलीत चमचाभर हळद घ्या. तसेच चमचाभर गरम मसाला घ्या. चमचाभर धणे- जिरे पूड घ्या आणि आवडीनुसार लाल तिखट घाला. त्यात थोडं पाणी घाला आणि व्यवस्थित कालवून घ्या. त्यात केळीचे काप बुडवा आणि छान घोळवून घ्या. थोडावेळ झाकून ठेवा.
३. आल्याचा तुकडा किसून घ्या. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करा आणि छान वाटून घ्या. पेस्ट करुन घ्या. आलं-लसूण-हिरवी मिरची अशी पेस्ट करुन घ्यायची. एका ताटात थोडा रवा थोडे तांदळाचे पीठ घ्यायचे.
४. आलं-लसूण पेस्ट कापांना लावून घ्या. थोडावेळ मॅरीनेट होऊ द्या. नंतर काप पिठात घोळवा आणि व्यवस्थित रवा लावून घ्या. गॅसवर तवा तापत ठेवा तवा तापल्यावर त्यावर तेल घाला. तेल जरा जास्त घ्या. त्यावर काप लावा आणि छान फ्राय करुन घ्या. दोन्ही बाजूनी खमंग परतून घ्या. गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत खा.