Turmeric Milk Vs Water : हळद घातलेलं दूध पिणं भारतात अनेक वर्षापासून केला जाणारा एक घरगुती औषधी उपाय मानला जातो. हळद घातलेलं दूध प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. एखादी दुखापत झाल्यावर दूधात थोडी हळद घालून देण्याची सवय अनेक घरांमध्ये असते, कारण त्यामुळे जखम लवकर भरते. स्वयंपाकघरात सहज मिळणारी हळद ही गुणांनी भरलेली असते. त्यात आढळणारं ‘कर्क्युमिन’ हे तत्व अनेक आरोग्य समस्या कमी करण्यात मदत करतं. तर बरेच लोक पाण्यात हळद घालूनही पितात. मात्र, दूध किंवा पाण्यात वापरली जाणारी हळद शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे. सोबतच अनेकांना असाही प्रश्न पडतो की, हळद घातलेलं दूध अधिक फायदेशीर की पाणी? तर हेच आज आपण पाहणार आहोत.
हळद घातलेलं दूध की हळदीचं पाणी काय चांगलं?
हळद दुधात किंवा पाण्यात घालून दोन्ही प्रकारे घेतली तरी फायदेशीर ठरते, पण शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. धर्मशिला नारायणा हॉस्पिटलच्या सीनियर डायटिशियन पायल शर्मा यांच्या मते, वजन कमी करायचं असेल किंवा शरीर डिटॉक्स करायचं असेल, तर हळदीचं पाणी योग्य आहे. तर हाडं मजबूत करायची, इम्युनिटी वाढवायची किंवा थंडी-खोकला कमी करायचा असेल, तर हळदीचं दूध घ्यावं.
दुधात असलेलं कॅल्शियम आणि व्हिटामिन्स हळदीसोबत शरीरात पटकन शोषलं जातं आणि हाडं मजबूत होतात. हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी घेणं उत्तम मानलं जातं.
हळदीचे मुख्य फायदे
हळदीमधील कर्क्युमिन हृदयविकाराचा धोका कमी करतं. मेंदूच्या पेशींची वाढ सुधारतं आणि शरीरातील सूज म्हणजेच इंफ्लमेशन कमी करतं. शरीरातले फ्री रॅडिकल्स दूर करून त्वचा आणि पेशींचं संरक्षण करतं. संधिवातासारख्या आजारांमध्येही आराम देतं.
हळदीच्या दुधाचे फायदे
स्ट्रेस कमी करतं आणि झोप सुधारतं. हाडं व स्नायू मजबूत ठेवतं. यातील कॅल्शियम, व्हिटामिन बी12 आणि डीमुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढतं.
एकंदर काय तर वजन कमी करायचं असेल तर हळदीचं पाणी, आणि इम्युनिटी व हाडांसाठी हळदीचं दूध दोन्हीही त्यांच्या जागी आरोग्यदायी पर्याय आहेत.
