दिवसाची सुरवात चांगली व्हावी यासाठी अनेक जण व्यायाम करतात तर काही जण पुजा-अर्चा करतात. मात्र असाही एक वर्ग आहे, ज्याला सकाळ चांगली करण्यासाठी हातात चहाचा कप लागतो. (try this trending tea recipe, See how to make dum ki chai, or potli chai, an unusual way to make tea)मस्त फक्कड चहा प्यायल्यावर अंगात तरतरी येते. चहाचा घोट घशाखाली उतरल्यावरच ओठांतून गूड मॉर्निंग बाहेर पडते. भारतात चहा फक्त पेय नाही, तर व्यसन मानले जाते. चहा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते. सध्या रोजच्या रेसिपी वेगळ्या पद्धतीने करुन पाहायचे फॅडच सुरु आहे. या ट्रेंडपासून चहाही काही वाचू शकलेला नाही. सध्या दम चहा किंवा पोटली चाय असा एक प्रकार फार प्यायला जात आहे. काहींना तो आवडला तर अनेकांनी फक्त नावं ठेवली. तुम्हीही करुन पाहा आणि ठरवा आवडतो का नाही. करायला सोपाच आहे.
साहित्य चहा पूड, साखर, आलं, तुळशीची पाने, वेलची, लवंग, पातळ सुती कापड, दूध, पाणी
कृती१. एका स्वच्छ सुती पातळ कापडात थोडी चहा पूड घ्यायची. साखर घ्यायची. तसेच लहान आल्याचा तुकडा घ्यायचा. दोन ते तीन तुळशीची पानेही घ्यायची. तसेच लवंगा घ्यायच्या. इतरही तुम्हाला चहात घालायला जे पदार्थ आवडतात ते घ्यायचे. कापडाची पुडी बांधून टाकायची.
२. एका पातेल्यात पाणी गरम करायचे. एका ग्लासमध्ये पाणी भरायचे. अर्धा ग्लास पाणी भरायचे आणि त्यावर सुती कापडाची पुडी ठेवायची. ग्लासमध्ये ती नीट बसवायची. त्यावर थोडे पाणी शिंपडायचे. फक्त पुडी ओली होईल याची काळजी घ्यायची. मग तो ग्लास पातेल्यात ठेवायचा. वरतून झाकण ठेवायचे.
३. दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवायचे. नंतर ग्लास काढून घ्यायचा आणि पुडीतला रस ग्लासातील पाण्यात पिळून घ्यायचा. व्यवस्थित सारा रस काढायचा. एका पातेल्यात दूध तापवत ठेवायचे. दूध जरा तापले की त्यात हे पाणी ओतायचे. मस्त उकळवायचे. चहापेक्षा जरा चव वेगळीच लागते. एकदा करुन पाहा.