उत्तर भारतात छोले हा पदार्थ खूप लोकप्रिय आहेच, पण संपूर्ण देशात काबुली चण्यांचा वापर विविध स्वरुपात केला जातो. त्याची चव आणि पोषण यामुळे ते आहारात नक्कीच असावेत. शक्यतो छोल्यांची रेसिपी फार तेलकट आणि पचायला जड असते. (Try this recipe for chole, easy to digest and nutritious too, don't eat oily chole )मात्र एकदा या पद्धतीने छोले करुन पाहा. क्रिमी होतात, चवही मस्त लागते. शिवाय फार कॅलरिज असलेल्या पदार्थांचा वापर न करताही रेसिपी करता येते.
साहित्य
दही, काबुली चणे, आलं, लसूण, चीज, पाणी, तूप, कांदा, टोमॅटो, मीठ, लाल तिखट, धणे - जिरे पूड, हिरवी मिरची, हळद , जिरे
कृती
१. काबुली चणे रात्रभर भिजवायचे. नंतर एका कुकरमध्ये घ्यायचे. त्यात मीठ घालायचे आणि थोडी हळद घालायची. कुकर लावायचा आणि चणे छान शिजवून घ्यायचे.
२. एका मिक्सरच्या भांड्यात शिजवलेले वाटीभर चणे घ्यायचे. त्यात वाटीभर दही घ्यायचे. काही लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या आणि त्याही त्यात घाला. एक चीज क्यूब घ्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घ्यायचे. सगळे पदार्थ छान वाटून घ्या. त्याची पेस्ट तयार करा. त्यात तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या.
३. एका पॅनमध्ये किंवा कढईत चमचाभर तूप घ्यायचे. त्यावर चमचाभर जिरे परतायचे. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदाही छान परतून घ्यायचा. बारीक चिरलेला टोमॅटो घाला. कांदा टोमॅटो शिजल्यावर त्यात लाल तिखट घाला. हळद घाला. धणे - जिरे पूड घाला. मसाला जरा परतला की त्यात थोडे पाणी घाला आणि मसाला शिजवूनही घ्या.
४. त्यात तयार केलेली पेस्ट ओता. पेस्ट छान परतून घ्या आणि नंतर त्यात शिजवलेले चणे घाला. जास्त घट्टपणा आला असेल तर थोडे पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला आणि एक वाफ काढून घ्या. अगदीच पातळ नको मध्यम अशी ग्रेव्ही तयार करायची. भात - चपाती आवडत्या पदार्थासोबत खा. पुरी किंवा भटुरे असतील तर आणखी मज्जा येईल. गरमागरम खा.
