महाराष्ट्रात पोहे हा पदार्थ नाश्त्यासाठी अगदी खास आहे. घरोघरी केला जाणारा हा पदार्थ खाऊन कधीही कंटाळा तर कोणाला येत नाही. जिभेला या पदार्थाची सवय झाली असते. त्यामुळे तो पुन्हा खायला कंटाळा येत नाही. (Try making poha this way once, it tastes different and is absolutely delicious)आठवड्यातून एकदा तरी पोहे घरी होतातच. पोह्याचेही विविध प्रकार असतात. एकदा पिवळे फोडणीचे पोहे न करता ही रेसिपी करुन पाहा. करायला अगदी सोपी आहे आणि चवीला एकदम भारी. नक्की आवडेल. पाहा कशी करायची.
साहित्य
पोहे, शेंगदाणे, तेल, मोहरी, काकडी, नारळ, हिरवी मिरची, आलं, कडीपत्ता, मीठ, साखर, कोथिंबीर, चणाडाळ, पाणी, जिरे, लिंबू
कृती
१. पोहे स्वच्छ धुवायचे. साधे पोहे करण्यासाठी जसे भिजवता तसेच करायचे. एक काकडी सोलून घ्यायची. काकडी सोलल्यावर किसून घ्यायची. तसेच ताजा नारळ फोडायचा आणि मस्त खवून घ्यायचा. आलं किसून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरायची.
२. एका खोलगट पातेल्यात किसलेली काकडी घ्यायची. त्यात खवलेला नारळ घालायचा. तसेच ओले पोहे घालून मिक्स करायचे. त्याला थोडी साखर लावा आणि मीठही लावा.
३. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर मोहरी घालायची. तसेच शेंगदाणे घालायचे आणि परतायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. चमचाभर जिरे घालायचे. भरपूर कडीपत्ता घालायचा आणि परतून घ्यायचा. त्यात चमचाभर चणाडाळ घालायची. फोडणी मस्त परतून घ्यायची. त्यात पोहे, काकडी आणि काकडीचे मिश्रण घालायचे. व्यवस्थित ढवळायचे. झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची.
४. वरतून चवीनुसार मीठ घालायचे. लिंबाचा रस घालायचा. गोड आवडत असेल तर आणखी थोडी साखर घालायची. तसेच बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. मस्त गरमागरम खायचे.
