हिवाळ्यात अनेक भाज्या मस्त आणि ताज्या मिळतात. त्यापैकी एक म्हणजे मटार. छान ताजे कोवळे मटार बाजारात येतात. तसेच स्वस्त दरात उपलब्ध असतात. इतर दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसांत मटार फारच स्वस्त असतात. मटारचे विविध पदार्थ करता येतात. चवीलाही छान लागतात. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे मटारचे भरीत. चवीला एकदम भारी लागते. तसेच करायला अगदीच सोपे आहे. झटपट होते आणि चपाती, भाकरी, भात सगळ्यासोबत एकदम मस्त लागते. नक्की करुन पाहा.
साहित्य
मटार, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, जिरे पूड, काश्मीरी लाल मिरची, मीठ, तेल, लिंबू, लसूण, मोहरी, पाणी, कडीपत्ता
कृती
१. छान ताजे मटार सोलून घ्यायचे. सोलून झाल्यावर उकळून घ्यायचे. किंवा शिजवून घ्यायचे. अगदी मऊ करायचे नाहीत. थोडेच शिजवायचे. कोथिंबीरीचे ताजी जुडी घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरुन घ्यायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे करायचे आणि पाण्यात भिजवायची.
२. दहा मिनिटे पाण्यात भिजवा आणि मग पाणी तसेच बिया काढून टाका. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरचीची पेस्ट तयार करायची. अर्धवट शिजवलेले मटार जरा कुस्करुन घ्यायचे. अगदी लगदा करु नका. फक्त जरा मऊ करुन घ्यायचे.
३. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर मोहरी घालायची आणि तडतडू द्यायची. त्यात कडीपत्ता घालायचा आणि फुलू द्यायचा. त्यात चमचाभर हिंग घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडेही परतायचे मग तयार केलेली पेस्ट घालायची. पेस्ट छान परतून घ्यायची. त्यात थोडे पाणी घालायचे. पेस्ट शिजवून घ्यायची. त्यात जिरे पूड घाला , चवी पुरते मीठ घालायचे. मटार घालायचे आणि परतून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. लिंबाचा रस घालायचा. ढवळायचे आणि एक वाफ काढायची. नंतर जरा खमंग परतायचे.
