भाज्यांमध्ये विविध प्रकार असतात. आवडीने खाल्या जाणाऱ्या अनेक भाज्यांपैकी एक म्हणजे गवार. घरोघरी ही भाजी केली जाते. तसेच बाराही महिने मिळणारी भाजी आहे. लहान - मोठे सगळेच आवडीने खातात. (Traditional spicy recipe for Gawar techa, it gives a rich and authentic flavor)गवार अनेक प्रकारे तयार करता येते. गवारीची भाजी तर नक्कीच खाल्ली असेल पण कधी गवारीचा ठेचा खाल्ला आहे का? ठेचा हा पदार्थ महाराष्ट्रात फार आवडीने खाल्ला जातो. गवारीचा ठेचा हा एक फार चविष्ट आणि वेगळा पदार्थ आहे. नक्की करुन पाहा.
साहित्य
शेंगदाणे, गवार, लसूण, हिरवी मिरची, तेल, मीठ, जिरे, कोथिंबीर
कृती
१. छान ताजी गवार मोडून घ्यायची. मध्यम आकाराचे तुकडे करायचे. स्वच्छ धुवायची. आणि मग एका पॅनमध्ये किंवा कढईत तेल घेऊन त्यात छान खमंग परतायची. गवार मस्त परतून झाल्यावर काढायची आणि त्याच पॅनमध्ये शेंगदाणे परतायचे.
२. शेंगदाणे छान खमंग परतायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसुणही छान परतून घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. ते तुकडेही परतून घ्यायचे. फोडणी छान खमंग परतून झाल्यावर गार करायची आणि ठेचून घ्यायची. मिक्सरमधून जाडसर वाटून घेतली तरी चालेल.
३. त्याच पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरे मस्त परतायचे. मग त्यात ठेचलेले मिश्रण घालायचे. छान परतायचे. त्यात बारीक चिरेलेली कोथिंबीर घालायची. ढवळायचे आणि परतून घ्यायचे. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खा. पोळीशीही मस्तच लागतो. एकदा हा पदार्थ करुन पाहा. नक्की आवडेल.
