भारतीय पारंपरिक पदार्थ काही किचकट असतात तर काही एवढे साधे की करायला अजिबात वेळ आणि कष्ट पडत नाहीत. असाच एक सिंधी पदार्थ म्हणजे दालपकवान. (Traditional recipe for making Sindhi dal pakwan at home, low-cost but special for feast)करायला अगदीच सोपा शिवाय जिन्नसही कमी आणि बेसिक. तरीही हा पदार्थ अप्रतिम लागतो. त्यामुळे नक्की करुन पाहा.
साहित्य
चणाडाळ, पाणी, मैदा, तूप, जिरे, मीठ, हळद, तेल, हिरवी मिरची, ओवा, काळीमिरी, आमचूर, लाल तिखट, कांदा, चिंच, रवा, गव्हाचे पीठ, कडीपत्ता
कृती
१. चार ते पाच तासांसाठी चणाडाळ भिजत घालायची. भिजल्यावर कुकरमध्ये घ्यायची, त्यात पाणी ओतायचे. थोडे मीठ घालायचे आणि हळदही घालायची. डाळ मस्त शिजवून घ्यायची. पाण्याचे प्रमाण कमी ठेवायचे. डाळ पातळ नाही होणार याची काळजी घ्यायची. घट्ट डाळ ठेवायची.
२. एका परातीत मैदा घ्यायचा. त्यात थोडा रवा घालायचा आणि थोडे गव्हाचे पीठही घालायचे. चांगले दोन चार चमचे गरम तूप घालायचे. थोडे मीठ घालायचे. थोडा ओवा घाला आणि जिरेही घाला. हळूहळू पाणी ओतून पीठ घट्टसर मळून घ्यायचे. मळून झाल्यावर ओल्या कापडाने झाकून सेट व्हायला ठेवा. तासभर ठेवा.
३. तासाभराने गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवा आणि पीठाच्या पातळ पुऱ्या लाटा. काटा चमच्याच्या मदतीने पुरीला भोकं पाडायची. गरम तेलात तळून घ्यायचे. झाऱ्याने पकवान दाबत राहा. ते फुगू द्यायचे नाही. म्हणजे कडक आणि कुरकुरीत होते. सगळे पकवान तळून घ्या मग तेल निथळवत ठेवा.
४. चणाडाळ शिजल्यावर स्मॅश करुन घ्यायची. फोडणी पात्रात तूप घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. कडीपत्ता घालायचा आणि फोडणी परतून घ्यायची. त्यात थोडे लाल तिखट घाला, हिरवी मिरची घाला आणि मग फोडणी डाळीत ओतायची. ढवळून घ्यायचे. थोडी मिरी पूड घालायची. थोडे आमचूरही घालायचे.
४. हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करा आणि चिंच भिजवून त्याचाही कोळ तयार करा. पकवानावर डाळ लावायची, त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरवा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तसेच चिंच घालून मस्त खा.
