कैरीचे लोणचे, लिंबू, आवळा, मिरची, बोरं अशा विविध प्रकाराची लोणची घरोघरी केली जातात. प्रत्येकाची चव वेगळी आणि खास असते. आजीच्या हातचं लोणचं आठवणीतलं असतं. गरम भात, तूप आणि एखादं झणझणीत लोणचं असलं की साधं जेवणही खास वाटतं. (Traditional pickle recipe: Easy recipe for garlic pickle, this spicy pickle is must try)लोणचं म्हणजे केवळ एक साइड डिश नव्हे, ती आपल्या सांस्कृतिक चवीचा तो भाग आहे. विविध प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे लसूण लोणचे. लसूण हा आहारातील महत्त्वाचा असा भाग आहे. आरोग्यासाठी लसूण चांगला असतो. महाराष्ट्रात लसूण चटणी हा तोंडीलावण्याचा प्रकार फार लोकप्रिय आहे. ही चटणी नक्कीच खाल्ली असेल. मात्र कधी सलूण लोणचे खाल्ले का? लसूण लोणचे चवीला एकदम झणझणीत आणि चविष्ट असते. करायला एकदमच सोपे असते. नक्की करुन पाहा. महिनाभर टिकते.
साहित्य
लसूण, तेल, मोहरी, मेथी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, लिंबू, बडीशेप
कृती
१. एका कढईत किंवा पॅनमध्ये चमचाभर मोहरी, दोन ते तीन चमचे जिरे तसेच थोडी मेथी घ्यायची. चमचाभर बडीशेप घ्यायची. तव्यावर भाजले तरी चालते. छान परतून घ्यायचे. तेल, पाणी काही न वापरता भाजायचे. सुकेच भाजायचे आणि मग गार करत ठेवायचे. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घालायच्या. जेवढे लोणचे हवे आहे त्यानुसार पाकळ्या घ्यायच्या. लसणाचा रंग जरा गडद होईपर्यंत परतून घ्यायचे. तेलही जरा जास्त वापरा अगदी तळायची गरज नाही.
२. लसूण गार करुन घ्या. गार झाल्यावर एका खोलगट भांड्यात काढून घ्या. त्यात तयीर केलेला मसाला घालायचा. तसेच थोडे मीठ घालायचे. हळद घालायची. लाल तिखट घालायचे. सगळे पदार्थ छान एकजीव करायचे. त्यात थडे कोमट तेल घालायचे. लिंबू पिळायचे आणि रस काढून घ्यायचा. बिया काढून फक्त रस त्यात घालायचा.
३. हवाबंद डब्यात लोणचे काढून घ्यायचे. त्यात थोडी परतलेली बडीशेप घालायची आणि ढवळून घ्यायचे. लोणचं चवीला एकदम मस्त लागतं. तसंच करायला एकदम सोपं आहे. भाताशी खाऊ शकता तसेच चपातीशीही मस्त लागते.