त्याच त्याच भाज्या खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. काहीतरी वेगळी रेसिपी करुन पाहायची इच्छा होते. अशीच ही रेसिपी नक्की करुन पाहा. करायला अगदी सोपी आहे. तसेच घरात असणार्याच पदार्थांचा वापर करुन करता येते. टोमॅटो - बटाटा रस्सा एकदा केला तर पुन्हा करालच. एवढी सोपी आणि मस्त रेसिपी आहे. (Tomato - Potato Rassa Recipe - Make this gravy in ten minutes, a delicious recipe)पाहा काय करायचे. दहा मिनिटांत होणारा हा रस्सा चमचमीत आणि झणझणीत असतो. तसेच भातासोबतही मस्त लागतो. कधी स्वयंपाक काय करावा सुचत नसेल तर हा पदार्थ करुन पाहा.
साहित्य
बटाटा, टोमॅटो, पाणी, कांदा, तेल, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची, आलं, लसूण, हिंग
कृती
१. बटाटे सोलून घ्यायचे. नंतर एका कुकरमध्ये सोललेले बटाटे आणि टोमॅटो घ्यायचे. त्यात चमचाभर मीठ घालायचे. तीन चार वाटी पाणी घालायचे. चमचाभर हळद घालायची. कुकर लावायचा आणि बटाटा - टोमॅटो उकडून घ्यायचे.
कोथिंबीरीची जुडी निवडायची. वय्वस्थित धुवायची आणि कोथिंबीर बारीक चिरायची. कांदा सोलायचा आणि कांदाही अगदी बारीक चिरायचा.
२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. आल्याचा तुकडा घ्या आणि हिरव्या मिरचीचेही तुकडे करुन घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात लसूण - आलं - हिरवी मिरची घ्या आणि वाटून त्याची छान पेस्ट तयार करा. कुकर उघडल्यावर टोमॅटोची सालं काढून घ्या आणि बटाटा - टोमॅटो कुस्करुन घ्या. स्मॅशरचा वापर करुन त्याचा अगदी लगदा करायचा.
३. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यावर आलं - लसूण - हिरवी मिरचीची पेस्ट परतून घ्यायची. छान खमंग परता मग त्यात कांदा घाला. कांदाही गुलाबी परतायचा. त्यात लाल तिखट घाला. चवी नुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. चमचाभर हिंग घाला. थोडे पाणी घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि भाजी ढवळून घ्या. झाकण ठेवा एक उकळी येऊ द्या. गरमागरम भाजी भातासोबत किंवा चपातीसोबत खा.
