इडली डोश्यासोबत खातात तशी हॉटेलस्टाईल तिखट गोड चटपटीत लाल टोमॅटोची चटणी करणं अतिशय सोपं आहे. ही चटणी चवीला उत्कृष्ट लागते तसंच जेवणाची लज्जतही वाढवते. ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. (Tomato Chutney Recipe) त्यात दोन मोठे चमचे तेल घाला, तेल गरम झालं की त्यात एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा चणा डाळ घालून त्या हलक्या सोनेरी रंगावर परतवून घ्या. यामुळे चटणीला छान खमंग चव येते आणि दाटपणा येतो. त्यानंतर ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चवीनुसार ५ ते ६ सुक्या लाल मिरच्या घाला. जर तुम्हाला चटणी जास्त तिखट हवी असेल तर मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता. (How To Make South Style Tomato chutney)
यामध्ये एक मध्यम आकाराच उभा चिरलेला कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्या. कांदा थोडा मऊ झाला की त्याच ३ ते ४ मध्यम आकाराचे पिकलेले लाल टोमॅटो चिरून घाला. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात थोडं मीठ आणि अगदी छोटा तुकडा चिंच घाला. चिंचेमुळे चटणीला छान आंबटपणा येतो. आता या मिश्रणावर झाकण ठेवून टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत ५ ते ७ मिनिटं शिजू द्या.
टोमॅटो छान शिजले की गॅस बंद करा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून त्याची एकदम बारीक पेस्ट तयार करा. आता या चटणीला खमंग फोडणी देण्यासाठी पुन्हा थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरं, थोडं हिंग आणि भरपूर कढीपत्ता घाला.
ही तडतडणारी फोडणी तयार चटणीवर घाला. तुमची झटपट आणि चविष्ट लाल टोमॅटोची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही गरमागरम इडली, कुरकुरीत डोसा किंवा उत्तप्पासोबत सर्व्ह करू शकता ही चटणी फ्रिजमध्ये दोन ते तीन दिवस चांगली राहते.
