जर घरी काहीच जेवण तयार नसेल आणि झटपट काहीतरी करायचे आहे तर डोक्यात पहिले भाताचाच प्रकार येतो. खिचडी असेल, फोडणीचा भात असेल किंवा वरण भात असेल. तसेच आजकाल फ्राइड राईस, इंस्टंट बिर्याणी असे पदार्थही केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे पुलाव. भाज्या घालून केलेला पुलाव सगळे आवडीने खातातच. (Tired of eating regular masoor? make masoor pulao - a great recipe, must try food )पण कधी मसुरडाळीचा पुलाव खाल्ला आहे का? ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि चवीलाही एकदम भारी. नक्की करुन पाहा. त्यासोबत दही, लोणचं किंवा रायता घ्या. अगदी छान लागतो.
साहित्य
मसुरडाळ, तांदूळ, पाणी, तूप, जिरे, लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, लिंबू, कोथिंबीर मीठ, गरम मसाला, कांदा-लसूण मसाला
कृती
१. एका वाडग्यात वाटीभर मसुरडाळ आणि अर्धी वाटी तांदूळ या प्रमाणात दोन्ही पदार्थ घेऊन त्यात पाणी ओतायचे. डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवायचे. नंतर वीस मिनिटांसाठी भिजत ठेवायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि मग ठेचून घ्यायच्या. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. तसेच टोमॅटोही बारीक चिरायचा. कोथिंबीर निवडायची. मस्त बारीक चिरुन घ्यायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे.
२. एका कुकरमध्ये किंवा कढईत चमचाभर तूप घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान फुलले की त्यात कांदा घालायचा. लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालून परतायच्या. नंतर कांदा छान परतून घ्यायचा. मग त्यात टोमॅटो घाला, चमचाभर हळद घाला. तसेच लाल तिखट घाला. कांदा - लूसण मसाला घालायचा आणि गरम मसालाही घालायचा. चवीपुरते मीठ घालायचे. ढवळायचे आणि मसाले परतून घ्यायचे.
३. त्यात थोडे पाणी घालायचे. नंतर भिजत ठेवलेले डाळीचे आणि भाताचे मिश्रण त्यात घालून ढवळायचे. त्यात पाणी घालायचे. लिंबाचा रस घालायचा. छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि नंतर कुकर असेल तर झाकण लावून शिटी काढायची आणि जर कढई असेल तर झाकून ठेवायचे. भात छान शिजला की मोकळा होतो. छान पिवळा - लालसर असा होतो. दह्यासोबत खा. जास्त छान लागतो.
