खाद्यपदार्थांची चव वाढण्यासाठी लसूण हमखास वापरतात. काही घरांमध्ये लसूण मोठ्या प्रमाणात वापरला जातो, परंतु जर लसूण नीट साठवून ठेवला नाही तर तो लवकर खराब होतो. कधीकधी त्याला बुरशीही लागते. त्यामुळे त्याची चवच जाते.
लसूण औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. जेवणात पदार्थांना फोडणी देण्यासाठी लसूण वापरला जातो. जेवण स्वादिष्ट तर बनतंच तसेच लसूण अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यास प्रभावी ठरतो.
बाजारातून लसूण घरी आणल्यानंतर विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा थोड्याशा निष्काळजीपणामुळे साठवलेला लसूण लवकर खराब होईल आणि पैसेही वाया जातील.
लसूण घरी आणल्यानंतर तो एका टोपलीत हवेशीर ठिकाणी ठेवा. ओलावा नसलेल्या ठिकाणी ठेवा असं केल्याने लसूण बराच काळ साठवता येतो. त्याची चव, गुणवत्ता जास्त काळ टिकवून ठेवायची असेल तर तो ओलाव्यापासून दूर ठेवा.
लसूणमध्ये व्हिटॅमिन बी३, व्हिटॅमिन सी, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट मुबलक प्रमाणात आढळतात. लसूणमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.