स्वयंपाक करताना आपण अनेक लहान-मोठ्या चुका करतो, ज्यामुळे अन्न खराब होतं आणि अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. स्वयंपाक करताना काही सामान्य चुका होतात, ज्या प्रत्येक घरात होतात - जसं की अन्न जास्त शिजवणं, ते पुन्हा पुन्हा गरम करणं, योग्य पद्धती न वापरणे, भांडी झाकून न ठेवता स्वयंपाक करणं. या चुकांपैकी एक चूक अशी आहे ज्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो, ती चूक म्हणजे चपाती शेकवण्याची चुकीची पद्धत.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला प्रत्येक गोष्ट लवकर करायची असते. विशेषतः सकाळी नाश्त्याच्या वेळी, आपल्याला ऑफिस किंवा शाळेसाठी लवकर जेवण बनवावं लागतं. अशा परिस्थितीत, लवकर चपाती बनवण्यासाठी, लोक अनेकदा चपाती तव्यावर मोठ्या आचेवर किंवा थेट गॅसवर ठेवतात आणि लगेच शेकवण्याचा प्रयत्न करतात. पण असं केल्याने चपाती फुगलेली दिसू शकते. पण हा शॉर्टकट चपातीला विषारी बनवू शकतो, ज्याचा हळूहळू तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
चपाती शेकवण्याची धोकादायक पद्धत
सोशल मीडियावर असा दावाही केला जात आहे की, चपाती शेकवण्याची ही पद्धत आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चपाती शेकवताना चूक केल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. मोठ्या आचेवर चपाती शेकवल्याने चपात्या लगेच फुगतात पण त्यामध्ये धोकादायक केमिकल्स तयार होऊ लागतात.
आरोग्यासाठी घातक
जेव्हा चपात्या मोठ्या आचेवर लवकर शेकवल्या जातात तेव्हा त्यामध्ये हेट्रोसायक्लिक एमाइन (HCA) आणि पॉलीसाइक्लिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन (PAH)सारखे कार्सिनोजेन्स तयार होऊ शकतात. एवढेच नाही तर गॅसमधून निघणारे कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड सारखे प्रदूषक वायू देखील चपातीमध्ये प्रवेश करू शकतात. या धोकादायक केमिकल्सचा आणि गॅसचा आरोग्यावर हळूहळू गंभीर परिणाम होतो. या पद्धतीचा वापर करून बनवलेली चपाती दररोज खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
चपाती बनवण्याची योग्य पद्धत
चपाती बनवताना ती नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर शेकवा. बरेच लोक अर्धवट शेकवल्यानंतर चपाती थेट गॅसवर ठेवतात, परंतु असं करू नये. तव्यावरच चपाती नीट शेकवावी. जास्त करपलेली चपाती खाणं टाळा कारण त्यातही कॅन्सर निर्माण होण्याची शक्यता वाढते.