इडली , डोसा, मेदूवडा अशा साऊथ इंडियन पदार्थांसोबत नारळाची चटणी आणि सांबार तर आपण खातोच. मात्र अनेक ठिकाणी एक लाल चटणीही त्यासोबत दिली जाते. खास म्हणजे फेरीवाले इडली अण्णा लाल चटणी देतात. ती फार लोकप्रिय आहे. सगळ्यांनाच फार आवडते. (The red chutney that comes with idli - medu vada is very easy to make at home - just like you get it in hotel)एक्सट्रा चटणी मागून लोकं खातात. ती चटणी तशीच्या तशी घरी करता येते. पाहा ही लाल टोमॅटो चटणी नक्की कशी करायची.
साहित्य
काश्मीरी लाल मिरची, टोमॅटो, लसूण, लाल तिखट, तेल, मोहरी, कडीपत्ता, कांदा, जिरे
कृती
१. काश्मीरी लाल मिरची पाच मिनिटे कोमट पाण्यात भिजवायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. कांदा सोलायचा आणि कांद्याचे तुकडे करायचे. टोमॅटोचेही तुकडे करायचे. मधे चिरुन दोनच तुकडे करा. म्हणजे नंतर सालं काढताना सोपे जाते.
२. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. त्यावर टोमॅटो उलटा ठेवायचा. सालंवरच्या दिशेला असू देत. लसणाच्या काही पाकळ्याही घालायच्या. त्यात कांदाही घालायचा. भिजवलेल्या लाल मिरचीच्या बिया काढायच्या. व्यवस्थित धुवायची आणि मग पॅनमध्ये घ्यायची. सारे पदार्थ मस्त पूर्ण शिजेपर्यंत परतायचे. टोमॅटोचा रंग बदलेपर्यंत परतायचे. मग सालं काढून टाकायची. टोमॅटो उलटायचा आणि दुसर्या बाजूनेही परतायचा.
३. कांदाही खमंग लालसर परतायचा मग गॅस बंद करायचा आणि मिश्रण गार होऊ द्यायचे. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटायचे. मस्त मध्यम घट्ट अशी चटणी तयार होते. पातेल्यात काढून घ्यायची.
४. एका फोडणीपात्रात थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच चमचाभर मोहरी घालायची. कडीपत्याची पाने घालायची आणि तडतडू द्यायची. फोडणी तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि वरतून थोडे लाल तिखट घाला. फोडणी लगेच तयार चटणीत ओता आणि ढवळा म्हणजे तिखट जळणार नाही.
