आजकाल अन्नपदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणून अनेक जण सवयीने सगळेच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र प्रत्येक अन्नपदार्थासाठी फ्रिज योग्य असतोच असे नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, पोषणमूल्ये आणि नैसर्गिक गुणधर्म कमी होतात, तर काही वेळा आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो.
१. शिजलेला भात फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्यातील नैसर्गिक उष्ण गुणधर्म कमी होतो. भात थंड झाल्यावर तो जड, चिकट आणि पचायला कठीण होतो. शिजलेला भात ताजा आणि कोमट असतानाच खाल्ला तर तो शरीराला ऊर्जा देतो. फ्रिजमध्ये ठेवलेला भात पुन्हा गरम केला तरी त्याची चव आणि पोषणही पूर्वीसारखे राहत नाही. काही वेळा चुकीच्या पद्धतीने साठवलेला भात पोटदुखी, अपचन किंवा अन्न विषबाधेचे कारणही ठरु शकतो.
२. डिवचलेले दही म्हणजे चमचा किंवा हात घातलेले दही फ्रिजमध्ये जास्त वेळासाठी ठेवणेही योग्य नाही. असे दही लवकर खराब होते, त्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि त्याचे प्रोबायोटिक गुणधर्म कमी होतात. दही ताजे आणि नैसर्गिक तापमानात ठेवावे आणि वेळेत खाल्ले तरच त्याचा शरीराला फायदा होतो.
३. आणखी एक पदार्थ म्हणजे कांदा. कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्यातील ओलावा वाढतो, त्यामुळे तो मऊ पडतो आणि लवकर सडतो. तसेच त्याची नैसर्गिक चव आणि गुणधर्म कमी होतात. कांदा नेहमी कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवणे योग्य ठरते.
४. आपण टोमॅटो कायम फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र तसे न करता तो आणल्यावर लवकर खाऊन संपवावा. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची साल सुरकुतते, आतील गर मऊ होतो आणि नैसर्गिक चव कमी होते. टोमॅटो खोलीच्या तापमानात ठेवल्यास तो जास्त चविष्ट आणि पौष्टिक राहतो.
५. मधही फ्रिजमध्ये ठेवणे टाळा. बाहेर ठेवलेले मध खराब होत नाही. तसेच फ्रिजच्या तापमानामुळे मधाचे पोषण कमी होते. त्यामुळे मध बाहेरच ठेवावे.
६. आपण शिजलेल्या परतलेल्या भाज्या खराब होऊ नयेत म्हणून फ्रिजला ठेवतो. वाटण, चटणी सगळंच फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र कोणताही प्रक्रिया झालेला पदार्थ दोन दिवसांच्यावर फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे ताजे खा आणि फ्रिजमध्ये एका दिवसासाठी किंवा दोन दिवसांसाठीच ठेवा. जास्त दिवसांसाठी साठवून ठेवणे टाळा.
