अशा अनेक भाज्या आहेत, तसेच फळे आहेत जी आपल्या रोजच्या वापरातली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती असते असे नाही. भाज्यांतही प्रकार असतात. (Takla is a vegetable that must be eaten during the monsoon season. It is very nutritious and tastes delicious.)पालेभाजी फार पौष्टिक असतात. फळभाजी असते तसेच फुलभाजी असते असे काही प्रकार असतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे रानभाजी. रानभाजी ओळखता येणे म्हणजे एक कलाच आहे असे म्हणावे लागेल. गावाकडे नित्यनियमाने अशा भाज्या खाल्या जातात. अनेक भाज्यांची नावेही आपल्याला माहिती नाहीत. पण रानभाज्याच फार पौष्टिक असतात. अशीच एक रानभाजी म्हणजे टाकळा. काही ठिकाणी तरोटा म्हणून ओळखली जाते तर काही ठिकाणी तरवटा. काही जण टायकूळ असे ही म्हणतात. ही रानभाजी पावसाळ्यात सगळीकडे मिळते. करायला फार सोपी आहे. अत्यंत पौष्टिक असते.
साहित्य टाकळा, मूग डाळ, कांदा, हिरवी मिरची, लसूण, हळद, मोहरी, जिरे, हिंग, मीठ, तेल, ताजा नारळ
कृती१. टाकाळ्याची भाजी स्वच्छ धुवायची. पाण्यात ठेवायची. रानभाज्यांवर माती फार असते. त्या नीट धुवायच्या मगच वापरायच्या. टाकाळ्याच्या पाला बारीक चिरायचा. कांदा बारीक चिरायचा. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. मूग डाळ भिजवायची. ताजा नारळ खवून घ्यायचा.
२. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात मोहरी घालायची. जिरे घालायचे. छान परतायचे. परतून झाल्यावर त्यात हिंग घालायचे. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या. सगळं छान खमंग परतायचे. मग त्यात चिरलेला कांदा घालायचा.
३. कांदा छान गुलाबी परतायचा मग थोडा नारळ घालायचा. अगदी थोडे पाणी घालायचे. हळद घालायची. तसेच मीठ घालायचे. मूग डाळ घालायची परतून घ्यायची. सगळं छान परतल्यावर त्यात टाकाळ्याची भाजी घालायची. परतायची. भाजी जरा झाकून ठेवा. एक वाफ काढा आणि गॅस बंद करा.
ही भाजी भाकरीसोबत फार सुंदर लागते. चपातीसोबतही छानच लागते. भाताशी तोंडी लावायलाही नक्कीच घेऊ शकता. टाकळा खाल्याने कफ कमी होतो आणि वात कमी करण्यात मदत होते.