उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वांच्याच घरी वाळवणाचे पदार्थ केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे कुरकुरीत अशी साबुदाणा, बटाटा चकली. साबुदाणा बटाटा चकली ही उपवासाच्या दिवशी खाल्ली जाते तर काहीजण उपवास नसतानाही ही चकली तळून खातात. ही चकली कुरकुरीत, खुसखुशीत आणि तेलात घातल्यानंतर फुलण्यासाठी काही टिप्स. तुमचं काम सोपं होईल. (How To Make Sabudana Batata Chakali)
पाण्याचं प्रमाण किती असावं?
साबुदाणा बटाटा चकली करण्याचीसाठी साबुदाणा जवळपास २ ते ३ वेळा स्वच्छ धुवा. ज्यामुळे यातलं अतिरिक्त स्टार्च निघून जातं आणि चकली चिकट होत नाही.साबुदाणा भिजवताना पाणी साबुदाण्याच्या वर फक्त अर्धा इंच येईल इतंकच ठेवा. साबुदाणा जास्त मऊ झाला तर चकल्या उशिरा सुकतात आणि तुटण्याची शक्यता असते. साबुदाणा किमान ६ ते ८ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा जेणेकरून तो आतपर्यंत मऊ होतो.
साबुदाणा, बटाट्यांचे प्रमाण
१ किलो साबुाणा घेणार असाल तर दीड किलो बटाटे घ्या. बटाटे जास्त झाले तर चकली मऊ पडते आणि कमी झालं तर चकली कडक होते. बटाटे उकडल्यानंतर ते हातानं कुस्करण्याऐवजी किसणीनं बारीक करा. यामुळे यात गाठी राहत नाही आणि साच्यातून गळताना अडकतही नाहीत.
मिश्रण कसं तयार करावं?
साबुदाणा वाफेवर शिजवून घेणार असाल तर तो पूर्णपणे शिजल्यावरच त्यात बटाट्याचा किस मिसळा. मिश्रण गरम असतानाच एकजीव केले तर चकलीला छान लवचीकता येते. या पदार्थांमध्ये मीठ घालताना जरा बेतानेच घालावे. कारण वाळवल्यानंतर पदार्थांत मिठाचं प्रमाण जास्त वाटतं.
चकल्या कशा सुकवाव्यात?
या चकल्या नेहमी जाड प्लास्टीक पेपरवर घालाव्यात. जेणेकरून त्या सुकल्यावर सहज निघतात. चकल्या किमान २ ते ३ दिवस कडक उन्हात वाळवाव्यात जर चकली आतून ओलसर राहिली तर ती तळताना फुलत नाही आणि त्याला कुबट वास येऊ शकतो. डब्यात भरताना चकल्या पूर्णपणे सुकल्या आहेत याची खात्री करून मगच भरा.
