उन्हाळ्यात गार पदार्थ खाण्याचा मोह काही टाळता येत नाही. पाणीही गारच प्यावेसे वाटते. मग सरबत, लस्सी , ज्यूस सारे रोजचेच. त्यात एक आणखी गोष्ट म्हणजे कुल्फी. उन्हाळ्यात गारेगार कुल्फी घ्यायची. मज्जाच काही वेगळी आहे. (Summer Special Kulfi - Make Matka Kulfi at home, creamy authentic Kulfi recipe)त्यात जर मटका कुल्फी असेल तर सोन्याहून पिवळं. विकतची मटका कुल्फी तर नेहमीच खात असाल. मात्र घरीही एकदम चविष्ट मटका कुल्फी करता येते. रेसिपी अगदी सोपी आहे. पाहा कशी करायची.
साहित्य
दूध, काजू, बदाम, पिस्ता, वेलची पूड, साखर, फॉईल पेपर
कृती
१. एका पातेल्यात दूध घ्यायचे. ते आटून निम्म होईपर्यंत उकळा. एका मिक्सरच्या भांड्यात काजू घ्या. तसेच बदाम घ्या आणि पिस्ता घ्यायचा. वाटून छान पूड तयार करायची. दुधात घालायची आणि ढवळून घ्यायचे. त्यात थोडी वेलची पूडही घालायची. ढवळून एकजीव करा आणि जरा वेळ उकळून घ्या.
२. एका पॅनमध्ये साखर घ्या. साखर गरम करा आणि सतत ढवळत राहा. गॅस कमीच ठेवायचा. सतत ढवळणं फार महत्वाचं आहे नाहीतर साखर जळते. हळूहळू साखर विरघळते आणि कॅरेमल रंग यायला लागतो. पूर्ण छान घट्ट झाली की दुधात ओतायची. ढवळून एकजीव करायची.
३. आणखी पाच मिनिटे उकळा आणि मिश्रण जरा घट्ट होऊ द्या. लहान वाटी किंवा भांड्यातही करु शकता मात्र मातीचं लहान मडकं असेल तर जास्त छान चव लागते. मडक्यात मिश्रण ओता आणि वरतून फॉइल पेपर लावा. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. सकाळपर्यंत मस्त सेट होते. चवीला अगदी मस्त लागते.
