उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की शरीरात उष्णता वाढते, घाम जास्त येतो आणि सतत तहान लागल्यासारखं वाटतं. अशा वेळी शरीराला थंडावा देणारे, ऊर्जा देणारे आणि पचनाला मदत करणारे एखादे नैसर्गिक पेय हवेसे वाटते. यासाठी घरोघरी विविध सरबतं केली जातात. (Summer special drink, Cool and refreshing drink with Natural energy, homemade shikanji )त्यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे शिकंजी. उष्णता कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. साध्या लिंबूपाण्यापेक्षा चवीनं थोडी वेगळी आणि मसालेदार अशी शिकंजी उत्तर भारतात विशेष प्रसिद्ध असली तरी आता ती सर्वत्र आवडीने प्यायली जाते.
शिकंजी करण्यासाठी सर्वप्रथम ताज्या लिंबांचा रस काढला जातो. या रसात साखर किंवा गूळ घालून तो व्यवस्थित विरघळवायचा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमूटभर काळं मीठ आणि भाजलेली जिरे पूड घालायची. काही जण त्यात बारीक चिरलेली पुदिन्याची पानं किंवा थोडंसं किसलेलं आलंही घालतात, ज्यामुळे शिकंजीला एक वेगळीच चव येते. हे सगळं मिश्रण थंड पाण्यात चांगलं ढवळून घेतलं की शिकंजी तयार होते. त्यात भिजवलेला छान फुललेला सब्जा घालायचा. हवे असल्यास त्यात बर्फाचे तुकडे घालून ती आणखी थंडगार करता येते.
शिकंजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लिंबामध्ये असलेले व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. उन्हामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी शिकंजी उपयोगी ठरते, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. त्यातील जिरे पूड आणि काळं मीठ पचनक्रिया सुधारतात आणि पोटातील जडपणा कमी करतात. साखर किंवा गूळ यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा दूर होऊन शरीर कार्यक्षम वाटते.
शिकंजी कधी प्यावी यालाही महत्त्व आहे. उन्हातून घरी आल्यानंतर, दुपारच्या वेळी किंवा व्यायाम केल्यानंतर एक ग्लास शिकंजी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र उपाशीपोटी खूप आंबट शिकंजी पिणे टाळावे, कारण त्यामुळे काहींना अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. जेवणानंतर थोड्या प्रमाणात घेतल्यास ती पचनास मदत करते. नेहमी शक्यतो शिकंजी ताजी करुनच प्यावी, कारण जास्त वेळ ठेवल्यास तिची चव आणि गुणधर्म कमी होतात. साखर जास्त प्रमाणात घालणे टाळावे आणि मधुमेह असणाऱ्यांनी साखरेऐवजी गूळ किंवा काहीच न घातलेली शिकंजी पर्यायी वापरणे योग्य ठरते.
एकूणच पाहता, शिकंजी हे फक्त तहान भागवणारे पेय नाही, तर उन्हाळ्यात शरीराला निरोगी ठेवणारा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. बाजारातील कृत्रिम थंड पेयांपेक्षा घरची शिकंजी अधिक सुरक्षित, ताजी आणि आरोग्यदायी आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात थंडगार शिकंजीचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहतील.
Web Summary : Shikanji, a refreshing Indian lemonade, is perfect for summer. It hydrates, boosts immunity with Vitamin C, aids digestion with cumin and black salt, and provides quick energy. Enjoy it after exercise or in the afternoon, but avoid on an empty stomach. Homemade is best!
Web Summary : शिकंजी, एक ताज़ा भारतीय नींबू पानी, गर्मी के लिए बिल्कुल सही है। यह हाइड्रेट करता है, विटामिन सी के साथ प्रतिरक्षा बढ़ाता है, जीरा और काले नमक के साथ पाचन में सहायता करता है, और त्वरित ऊर्जा प्रदान करता है। व्यायाम के बाद या दोपहर में इसका आनंद लें, लेकिन खाली पेट खाने से बचें। घर का बना सबसे अच्छा है!