इडली (Idli) एक असा पदार्थ जो सर्वांनाच नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला खायला आवडतो. पण घरी बनवलेली इडली सॉफ्ट, मुलायम होत नाही. इडल्या घट्ट किंवा कडक होतात. अशा वेळी पीठ आंबवण्याच्या काही छोट्या ट्रिक्स वापरल्या तर इडली अगदी हॉटेलसारखी मऊ आणि चविष्ट होते. पीठ आंबवण्याच्या काही पद्धती आहेत. ज्यामुळे पावसाळ्यातही पीठ चांगलं फुलून येईल. (Soft Idli Making Tips)
उडीद डाळ व तांदूळ साधारण १:३ प्रमाणात घ्या. १ वाटी डाळ, ३ वाट्या तांदूळ. उडीद डाळ ४-५ तास, तर तांदूळ ६-७ तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ आणि तांदूळ वेगवेगळं वाटून घ्या, डाळ अगदी हलक्या हाताने वाटा. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करून हाताने चांगले फेटा. हाताच्या उष्णतेमुळेही आंबण्यास मदत होते. पीठाचा घट्टपणा केकच्या पीठासारखा असावा हे बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ नसावे.
थंड हवामानात आंबण्यास वेळ लागतो. त्यामुळे पीठ एका गरम जागेत ठेवा ओव्हन, मायक्रोवेव्ह किंवा झाकलेल्या भांड्यात ठेवा. भांड्याखाली कोमट पाण्याची पातेली ठेवून वर पीठ ठेवल्यास उष्णता टिकते. हिवाळ्यात १-२ चमचे कोमट दूध किंवा थोडी साखर घातल्यास आंबण्याची प्रक्रिया जलद होते.
पीठ व्यवस्थित आंबण्यासाठी उष्ण हवामानात ८-१० तास थंड हवामानात १२-१४ तास ठेवावे लागते. पीठ दुप्पट झाले आणि वर छोटे-छोटे बुडबुडे आले, म्हणजे पीठ योग्यरित्या आंबले. पीठ हलक्या हाताने ढवळा, जास्त हलवू नका. इडलीच्या साच्याला हलका तेलाचा हात लावा आणि लगेच वाफवा. वाफवताना झाकण घट्ट बंद ठेवा, मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे इडली शिजण्यासाठी पुरेशी असतात.
इडली मऊ होण्यासाठी काय करायचं?
१) उडीद डाळ ताजी असावी जुनी डाळ वापरली तर पीठ नीट आंबत नाही. मेथी दाणे जरूर घाला. यामुळे पीठ चांगले फुलते आणि इडली मऊ होते. पाणी थोडे-थोडे घालून वाटा.
२) उडीद डाळ फार पातळ वाटली तर पीठ सैल होऊन इडली घट्ट होते. पीठ फेटणे आवश्यक आहे. वाटल्यावर हाताने ३-४ मिनिटे फेटल्याने पीठात हवा जाते आणि इडली फुलते.
३) हिवाळ्यात पीठ गरम जागेत ठेवा किंवा ओव्हनमध्ये लाईट ऑन करून ठेवा. पीठ आंबवल्यावर मीठ घाला आधी घातले तर आंबण्याची गती कमी होते. साच्याला तेलाचा पातळ थर लावा ज्यामुळे इडली चिकटत नाही.
४) मध्यम आचेवर शिजवा. जास्त आचेवर वाफवले तर इडली कडक होते. झाकण घट्ट लावा. वाफ बाहेर गेली तर इडली नीट फुलत नाही. वाफवल्यावर लगेच साचा उघडू नका २ मिनिटं थांबा, मग चमच्याने अलगद काढा.