वडापाव आणि मसाला पाव हे दोन्ही पदार्थ चवीला छान असतात. मात्र कधी या दोन्हीचे कॉम्बिनेशन खाल्ले आहे का? मसालेदार आलू-पनीर टिक्की भरलेला मसाला पाव एकदा नक्की करुन पाहा. (Special food for kids - fusion vada pav, very rich in taste, easy to make)चवीला फारच मस्त लागतो. करायला सोपा आहे.
पाव, बटाटा, पनीर, तेल, लसूण, हिरवी मिरची, कडीपत्ता, हळद, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे पूड, कांदा, टोमॅटो, बटर, शेव
कृती
१. बटाटे उकडून घ्यायचे. उकडलेले बटाटे छान सोलून घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोला, हिरव्या मिरचीचे तुकडे करा आणि लसूण - मिरचीची पेस्ट तयार करुन घ्या. ठेचून करा किंवा मिक्सरमधून वाटून घ्या. पनीर किसून घ्यायचे.
२. एका कढईत थोडे तेल गरम करा त्यात लसूण - मिरचीची पेस्ट घाला. मस्त परता नंतर कडीपत्ता घालून परतून घ्यायचा. त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन घाला. व्यवस्थित स्मॅश करुन घ्यायचा. त्यात किसलेले पनीर घालायचे आणि चमच्याने सारे पदार्थ एकजीव करुन घ्यायचे. जरा दोन मिनिटे परतायचे. मग त्यात हळद घालायची. चवी पुरते मीठ घालायचे. लाल तिखट घालायचे. चमचाभर जिरे पूड घालायची आणि मस्त परतून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला.
३. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या घ्या. बारा - पंधरा तरी घ्या. त्यात चमचाभर लाल तिखट घाला, चमचाभर जिरे पूड घाला आणि थोडे पाणी घाला. त्याची पेस्ट वाटून घ्या. एका पॅनमध्ये बटर घ्या, त्यावर ती पेस्ट ओता आणि परतून घ्या. त्या मसाल्यावर पाव परतून घ्यायचे.
४. बटाटा - पनीर मिश्रणाच्या टिक्की तयार करा. पॅनमध्ये किंवा तव्यावर तेल घाला आणि त्यावर टिक्की परता. दोन्ही बाजूंनी खमंग, कुरकुरीत परतायचे. परतून झाल्यावर टिक्की काढून घ्या. कांदा टोमॅटो गोलाकार चिरुन घ्या. मसालेदार परतलेल्या पावात टिक्की भरा, कांदा तसेच टोमॅटोही भरा आणि दुसऱ्या बाजूनी बंद करुन शेवेत बुडवा नंतर वडापावसारखा खा. एकदम मस्त लागतो.
