कितीही विविध विदेशी पदार्थ प्रसिद्ध झाले तरी भारतीय काही पदार्थ आहेत ज्याची सर इतर कशालाच येत नाही. चहासोबत किंवा नाश्त्यासाठी असे काही पदार्थ आपण खातो जे फार साधे असतात मात्र चवीला एकदम भारी. जसे की वडा आणि भजी. (Soft inside and crispy outside, make tasty recipe of Bonda Bhaji at home )हे पदार्थ भारतभर सगळीकडे मिळतात. राज्यानुसार रेसिपी बदलते. बटाटा आणि कांदा भजी तर नेहमीच खाता मात्र कधी बोंडा भजी खाल्ली आहे का? मऊ आणि सोपी अशी ही भजी नक्की करा.
साहित्य
दही, पाणी, हिरवी मिरची, जिरे, ओवा, मीठ, बेकींग सोडा, तेल, मैदा
कृती
१. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे आणि ठेचून त्याची पेस्ट तयार करायची. एका खोलगट पातेल्यात दही घ्यायचे. वाटीभर दही घेतले तर त्यात दोन वाटी मैदा घालायचा. मैदा आणि दही एकत्र करुन घ्यायचे. एकजीव करायचे. त्यासाठी सतत ढवळत राहायचे. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. तयार केलेली मिरचीची पेस्ट त्यात घालायची. चवीनुसार मीठ घालायचे.
२. चमचाभर जिरे घालायचे. तसेच ओवा हातावर घ्यायचा आणि मळून त्यात घालायचा. चमचाभर बेकींग सोडा घालायचा. व्यवस्थित ढवळायचे. पातळ करु नका घट्टच ठेवायचे. छान पीठ एकजीव करायचे. कढईत तेल गरम करत ठेवायचे. हाताला पाणी लावायचे आणि तयार मिश्रणाचा गोळा हातात घ्यायचा. अंगठ्याच्या मदतीने तेलात गोळे सोडायचे.
३. रंग सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचे. छान खमंग आणि बाहेरुन कुरकुरीत होईपर्यंत परतायचे. आतून मऊ आणि बाहेरुन छान खमंग असे होतात. गरमागरम खायचे. सोबत नारळाची चटणी घ्या किंवा इतर कोणती चटणी घ्या. सॉसपेक्षा चटणीसोबत जास्त चविष्ट लागते. नक्की करुन पाहा.
