आंब्याचा मौसम सुरु झाला की ठिकठिकाणी आंबा विक्रेते दिसू लागतात. पेट्यांचे चढे भाव त्याहीपेक्षा खवय्यांचा चढा उत्साह म्हणजे पूछो मत! मुह मांगी किंमत देऊन आंबा खरेदी करण्याची लोकांची तयारी असते. पूर्वी अक्षय्य तृतीयेला आंब्याची पेटी घरात आणून तिची रीतसर पूजा केली जाई. आता तर गुढीपाडव्याला अनेकांच्या नैवेद्याच्या थाळीत आंब्याचा रस दिसू लागतो. काहीही म्हणा, पण आंबा इज ए लव्ह! तो कोणत्याही स्वरूपात द्या, त्याची गोडी कमी होणार तर नाही, उलट वाढेलच!
याच विचाराने एका कस्टमरने आपल्या जवळच्या नातेवाईकासाठी आंब्याचा केक बनवून मागितला. बेकरीमध्ये असे शेकडो आंब्याचे केक मिळतात, पण आपण काहीतरी हटके करावं या हेतूने पुण्याच्या मानसी आणि नंदिनी देशपांडे यांनी आंबा पेटी केक बनवायचा असं ठरवलं!
'ट्रिक्स अँड ट्रीट्स' या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांनी आंबा पेटी केकचा व्हिडीओ शेअर केला आणि लोकांनी त्यांच्या प्रयत्नाला भरभरून दाद दिली. त्या लिहितात, 'आम्ही या ऑर्डरकडे संधी म्हणून पाहिले. आमच्या एका कस्टमरने त्यांच्या नणंदेसाठी आंब्याचा केक बनवून मागितला. त्यात आंबा हवा एवढीच सूचना त्यांनी दिली. पण त्यांची नात्यातली आपुलकी पाहता आम्हाला स्पेशल टच द्यावासा वाटला आणि आम्ही आंबाच काय तर आंब्याची पेटी बनवायची ठरवली.
'त्यासाठी आम्ही सॉफ्ट मँगो केक बेस बनवला. त्यात चॉकलेट फिलिंग भरलं. आंब्यासकट, गवतही एडिबल व्हावं, यासाठी केक आणि फॉन्डन्टचा वापर केला. त्यामुळे संपूर्ण आंबा पेटी केक खाण्यासाठी तयार झाला.
मागे एकदा पैठणी साडीचा केक व्हायरल झाला तसा यंदा आंबा पेटी केक व्हायरल होईल असं दिसतंय. केक चा फ्रेश लूक पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.