Join us

डाळ शिजवताना वरती येणारा पांढरा फेस असतो घातक, पाहा डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:21 IST

Pulses Boiling Method : अनेकदा चुकीच्या पद्धतीमुळे डाळ शिजवताना वर फेस येतो. जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

Pulses Boiling Method : भारतीय घरांमध्ये रोज वेगवेगळ्या डाळी आवडीनं खाल्ल्या जातात. तूर डाळी, मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ या डाळी रोजच्या जेवणातील महत्वाच्या भाग असतात. महत्वाची बाब म्हणजे या डाळींची टेस्ट तर भारी असतेच, सोबतच यातून भरपूर प्रोटीन, फायबर, व्हिटामिन आणि मिनरल्स शरीराला मिळतात. अनेक गंभीर आजारांमध्ये काही डाळी तर औषधींचं काम करतात. हे सगळं ठीक आहे. पण डाळ बनवण्याची योग्य पद्धत माहीत असणं खूप गरजेचं ठरतं. कारण अनेकदा चुकीच्या पद्धतीमुळे डाळ शिजवताना वर फेस येतो. जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

डायटिशिअन रमिता कौर यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, डाळी शिजवताना वर फेस येतो. हा फेस शरीराचं नुकसान करू शकतो. डाळी फेस येण्याचं कारण त्यातील एक तत्व असतं. जे शरीराचं नुकसान करतं. त्यामुळे डाळ शिजवण्याआधी एक काम केलं पाहिजे.

डाळींमध्ये फेस येण्याचं कारण

डाळी किंवा शेंगांमध्ये सॅपोनिन नावाचं तत्व असतं. ज्यामुळे त्यात फेस तयार होतो. सॅपोनिन एक ग्लायकोसाइड असतं. जेव्हा हे तत्व पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा त्यात मिक्स होतं. उकडल्यानंतर ते हवेच्या संपर्कात येतं आणि फेस तयार होतो.

घातक असतो फेस

एक्सपर्टनुसार, डाळीमधील सॅपोनिन हे तत्व फार घातक असतं. कारण ग्लायकोसाइडचं नॅचरल स्ट्रक्चर डॅमेज असतं आणि अशा पदार्थांचं सेवन करणं घातक ठरू शकतं. त्यामुळे डाळ शिजल्यावर वर आलेला फेस काढून टाकला पाहिजे. चमच्याच्या मदतीनं हा फेस सहज काढता येतो.

काय काय होतं नुकसान?

डाळीमधील या फेसानं पोट आणि पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचन अशा समस्या कॉमन आहेत. 

डाळ शिजवण्याआधी काय कराल?

पोट आणि पचनासंबंधी समस्यांपासून बचाव करायचा असेल तर डाळी, चणे भिजवून ठेवा. रात्रीभर डाळ भिजवून ठेवू शकता, ज्यामुळे त्यांचं डायजेशन सोपं होतं. तसेच डाळ शिजवताना फेस काढू टाका.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सकिचन टिप्स