Join us

Shravan Special traditional Food: सातूच्या पिठाचे रानभाज्यांचे मुटके, श्रावण स्पेशल पारंपरिक पचायला हलका पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 14:49 IST

Shravan Special traditional Food: अस्सल पारंपरिक चवीचा वन पॉट मिल व्हावा असा स्वादिष्ट पदार्थ

ठळक मुद्दे पचायला हलके, पौष्टीक, स्वादिष्ट व गरमागरम वन पॉट मील सातूचे मुटके. असे हे सातूचे मुटके साजूक तूप घालून फार छान लागतात.

शोभना कानस्कर, (कोपरखैरणे, नवी मुंबई)

मी मूळची विदर्भाची म्हणजेच चंद्रपूर जिल्हा. आमच्या भागात सातूच्या पिठाचे रानभाज्यांचे मुटके खूप प्रसिद्ध आहे. सकाळच्या न्याहारीला असो की रात्रीच्या जेवणात, सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ आहे. पावसाळ्यात तर हे मुटके खाण्याची मजाच वेगळीच. जेव्हा आमच्या घरी रानभाज्या यायच्या तेव्हा माझी आई हा मेनू हमखास करायची. करायला सोपी, पौष्टिक, पारंपरिक व स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. अशी ही वन पॉट मील रेसिपी एकदा आम्ही प्रवासात कॅसरॉल मध्ये घेऊन गेलो होतो. तेव्हा कॅसरॉल उघडताच त्याचा सुगंध इतका दरवळला की शेजारच्या जोडप्याने टेस्ट करणाची इच्छा जाहीर केली. त्यांना हे मुटके इतके आवडले की त्यांनी ही रेसिपी माझ्याकडून लिहून घेतली. पचायला हलकी असल्यामुळे माझे सासू सासरे पण आवर्जून मला हे मुटके करायला सांगतात . माझी आजी रानभाज्या आणल्या की त्यांची कोवळी देठे वेगळी काढून ते मुटके बनवण्यासाठी वापरत असे.

 

सातूच्या पिठाचे रानभाज्यांचे मुटके

साहित्य

सातूचे पीठ 2 वाट्या,  पालेभाज्याची कोवळी देठे प्रत्येकी 1/2 वाटी धुऊन बारीक चिरलेली (पालकाची देठे, चवळीची देठे), गाजराची साल 1/4 वाटी, लाल तिखट, हळद, कैरीचा गर दोन लहान चमचे, गूळ एक चमचा, मोहरी, जिरे मिळून एक चमचा, अद्रक+लसूण पेस्ट एक चमचा, हिंग, तेल, तूप, मीठ व पाणी आवश्यकतेनुसार

श्रावण शुक्रवारी गूळ फुटाण्यांचा नैवैद्य दाखवा आणि आठवणीने खा! महिलांसाठी ५ महत्वाचे फायदे..

कसे करायचे?

प्रथम एका भांड्यात सातूचे पीठ घेऊन त्यात पालेभाज्यांची देठे , गाजराची साल, लाल तिखट, हळद, मीठ, तेल दोन चमचे, हिंग व पाणी घालून मळून 5 मिनिटे ठेवणे.

 

नंतर या कणकेला हवा तसा मुटक्याचा आकार देणे. आता कढईत तेल घेऊन त्यात मोहरी जिरे, अद्रक+लसूण पेस्ट, हिंग, लाल तिखट, हळद घालून परतवणे. या फोडणीत लगेच एक ते दिड ग्लास पाणी घालणे.

चिमूटभर हळद घेऊन 'या' पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही, मजबूत, पांढरेशुभ्र होतील

या पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात तयार मुटके, कैरीचा गर, गूळ व मीठ घालून 10 ते 12 मिनिटे झाकण ठेवून मंद गॅस वर शिजवणे. अशा प्रकारे झाले तयार आपले पचायला हलके, पौष्टीक, स्वादिष्ट व गरमागरम वन पॉट मील सातूचे मुटके. असे हे सातूचे मुटके साजूक तूप घालून फार छान लागतात.

 

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.श्रावण स्पेशल