कणकेचे तळलेले मोदक चवीला एकदम मस्त लागतात. करायला कठीण वाटले तरी अजिबात कठीण नाहीत. (Shravan Special Traditional Dish, Yummy and Juicy Taste, fried Modak recipes )काही लहान स्टेप्स लक्षात ठेवा आणि मस्त मोदक तयार करा. प्रसादासाठी तसेच घरी काही कार्य असल्यास गोडाचा पदार्थ म्हणून असे मोदक नक्कीच करा. करायला जास्त वेळही लागत नाही आणि चवीला एकदम भारी असतात.
साहित्य गव्हाचे पीठ, नारळ, तूप, गूळ, वेलची पूड, पाणी, मीठ, तेल
कृती१. छान ताजा नारळ घ्यायचा. नारळ खवून घ्यायचा. गूळ छान बारीक किसायचा. ओल्या नारळाचे मोदक केले जातात तसेच सुकं खोबरं वापरुनही केले जातात. त्याची चवही छानच लागते. त्यामुळे ताजा रसाळ नारळ नसेल तर खोबरंही वापरु शकता. बाकी कृती सारखीच आहे.
२. एका कढईत किंवा पॅन मध्ये चमचाभर तूप घ्यायचे. तूप गरम करायचे आणि त्यात नारळ घालायचा. तसेच लगेच किसलेला गूळही घालायचा आणि ढवळायचे. गूळ विरघळेपर्यंत ढवळायचे. नारळ आणि गूळ एकजीव होऊन छान सारण तयार करायचे. त्यात चमचाभर वेलची पूड घालायची आणि वरतून दोन चमचे तूप घालायचे. छान सारण तयार करायचे. गूळाचे प्रमाण घेताना तुम्हाला कितपत गोड आवडते याचा अंदाज घ्या.
३. सारण तयार झाल्यावर गार करत ठेवायचे. एकीकडे कणीक मळायची. एका परातीत गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचे. गरम केलेले चमचाभर तूप घ्यायचे आणि त्याची मध्यम कणीक मळायची. पुरीसाठी जसे पीठ मळता तसेच पीठ मळायचे. जरा सैलसर हवे. अगदीच घट्ट नको. त्याच्या लहान लाट्या तयार करायच्या आणि बोटांनी पाळी तयार करायची. त्याला आकार द्यायचा आणि त्यात सारण भरायचे. मोदकाच्या पाळ्या तयार करुन जोडायच्या आणि मोदक बंद करुन टाकायचा. असेच सगळे मोदक तयार करायचे.
४. गॅसवर तेल गरम करत ठेवायचे. तेल तापल्यावर त्यात एकएक मोदक सोडा आणि तळून घ्या. गॅस मंद ठेवायचा. ते करपणार नाही याची काळजी घ्यायची. मोदक मस्त खमंग तळून झाल्यावर त्याचे तेल निथळवायचे आणि मग मोदक गार करायचे.