Join us

Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; बिना कांदा-लसूण पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:31 IST

Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या पानात कांदा लसूण न घालता कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसेपी तुम्हाला नक्की कामी येईल. 

येत्या शुक्रवारपासून अर्थात २५ जुलैपासून श्रावणमास (Shravan 2025) सुरु होत आहे. जिवतीचे व्रत, श्रावण सोमवार, मंगळागौर, श्रावण शनिवार शिवाय नागपंचमी, रक्षाबंधन असे सण महिन्याभरात येत राहणार. अशा वेळी श्रावणात नैवेद्याला (Shravan Special Recipe 2025) बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, फ्लॉवरची भाजी, मिक्स कुरमा भाजी, पनीरची भाजी, मूग-मटकी उसळी, पालेभाज्यांची पातळ भाजी करता येईल. त्याबरोबरच डाव्या बाजूला विविध प्रकारच्या कोशिंबिरींमध्ये झटपट होणारी ही कोबीच्या चटक्याची रेसेपी समाविष्ट करून घेता येईल. चला तर पाहूया साहित्य. 

कोबीचा चटका रेसेपी 

साहित्य : हिरवा कोबी, पाव वाटी भिजवलेली चणा डाळ, दीड वाटी दही, ३ तिखट मिरच्या, फोडणीसाठी दोन चमचे तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, चमचाभर साखर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 

कृती : 

>> पांढऱ्या कोबीला वास येतो, त्यामुळे हिरवा कोबी निवडावा. तो बारीक किसून घ्यावा. 

>> कोबी किसल्यावर तो किस पिळून घ्यावा, अतिरिक्त पाणी निघून जाते आणि कोबीची उग्र चव कमी होते. 

>> भिजवलेली डाळ आणि मिरची जाडसर वाटून घ्यावी आणि कोबीमध्ये मिसळून घ्यावी. 

>> फोडणीच्या भांड्यात तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद आणि मिरच्या घालाव्यात. चुरचुरीत फोडणी कोबीवर घालावी. 

>> दही फेटून घ्यावे आणि कोबीमध्ये घालावे. चमचाभर साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालावी. 

>>श्रावण स्पेशल कोबीचा चटकदार चटका खाण्यासाठी तयार. 

पाहा पुण्याच्या करंदीकर काकूंनी केलेली रेसेपी -

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1968986120305159/}}}}

टॅग्स :अन्नश्रावण स्पेशलपाककृतीश्रावण स्पेशल पदार्थ