उपासाला काय नवीन करणार? तेच तेच पदार्थ आपण नेहमी करतो. अर्थात गरमागरम साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, रताळ्याचे काप हे सारे पदार्थ तसे चवीला एकदम मस्त असतात. (Shravan Special Recipe: curd potato recipe for fasting, delicious dish, make it in just few minutes )त्यामुळे तेच तेच खाण्याचा कंटाळा येत नाही. त्याच्या जोडीला काही वेगळे करता आले तर मात्र नक्कीच मज्जा येईल. सकाळी उठल्यावर पटकन आठवते की आज तर उपास आहे. मग चटकन काय करता येईल ? पुढच्या वेळी हा पदार्थ करा. बटाटे आणि दही या दोन पदार्थांचे असे भन्नाट कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडेल. करायला अगदी सोपा पदार्थ आहे. दहा मिनिटांत तयार होतो. फक्त बटाटे परतायचे काम. बाकी काहीच कष्ट नाही. ताजे छान दही वापरले की मग हा पदार्थ कितीही खा मन भरणारंच नाही. पाहा दही बटाटा करायची साधी रेसिपी.
साहित्य
बटाटा, दही, जिरं, तूप, मीठ , हिरवी मिरची
कृती
१. लहान बटाटा घ्यायचा. ज्याला बेबी पोटॅटो असे म्हटले जाते. साले सोलून घ्यायची. मग पाण्यात स्वच्छ धुवायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे आणि मग जरा ठेचून घ्यायची. मिक्सरमधून वाटून पेस्ट केली तरी चालेल.
२. एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचे. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालायचे. जिरं तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची घालायची. मस्त परतायची. जिरं आणि हिरवी मिरची छान परतल्यावर त्यावर अख्खे बटाटे घालायचे. जर लहान बटाटे मिळाले नाही तर मोठ्या बटाट्याचे काप करुन घ्यायचे. छान परतून घ्यायचे.
३. जरा कुरकुरीत झाले की त्यात मीठ घालायचे. झाकण ठेवा आणि एक वाफ काढून घ्या. तूप जरा जास्त वापरायचे. छान खमंग परतायचे. परतून झाल्यावर एका खोलगट पातेल्यात काढून घ्यायचे. त्यावर दही घालायचे. मस्त घट्ट आणि ताजे गोडसर दही घ्यायचे. बटाट्यावर दही ओतायचे आणि मिक्स करायचे. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. चवीला मात्र एकदम जबरदस्त.