श्रावणात काही खास भाज्या केल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे श्रावण घेवडा. या महिन्यात छान ताजा घेवडा मिळतो. (Shravan Special: Quick recipe for making juicy Shravan Special Recipes, Shravan special green beans )चवीला गोडसर असणाऱ्या शेंगा श्रावणात मिळतात. ही भाजी चवीला अगदी मस्त लागते. कांदा - लसूण काहीही न वापरता अगदी स्वादिष्ट अशी घेवड्याची रसाळ भाजी करता येते. श्रावणात खास पदार्थ तर करायलाच हवेत. पाहा श्रावण घेवडा करायची अगदी साधी सोपी पद्धत.
साहित्य
घेवडा, मोहरी, जिरे, शेंगदाणे, हिंग, तेल, ओवा, हिरवी मिरची, लाल तिखट, बटाटा, कोथिंबीर, गूळ मीठ, हळद, धणे पूड
कृती
१. घेवड्याची भाजी स्वच्छ धुवायची. शेंगा मोडून घ्यायच्या. मध्यम आकाराचे शेंगांचे तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची. स्वच्छ धुवायची आणि नंतर बारीक चिरुन घ्यायची. हिरव्या मिरचीचेही तुकडे करुन घ्यायचे. बटाटा सोलून घ्यायचा. त्याचे लहान तुकडे करुन घ्यायचे.
२. शेंगदाणे परतून घेत ले तरी चालते. पण या भाजीत उकडलेल्या शेंगदाण्याची चव जास्त छान लागते. कुकरमध्ये उकडायचे किंवा पातेल्यात गरम पाणी करुन त्यात थोडे मीठ घालून शेंगदाणे शिजवून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही.
३. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरं छान फुलल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की थोडा ओवा घालायचा. जास्त ओवा घालू नका. अगदी थोडाच घाला. अर्धा चमचा हिंग घाला. हिंग घातल्यावर घेवडा अजिबात बाधणार नाही. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. त्यात बटाट्याचे तुकडे घालायचे आणि परतून घ्यायचे. बटाटा शिजत आल्यावर त्यात घेवडा घालायचा. घेवडा घातल्यावर ढवळायचे आणि झाकण ठेवायचे. एक वाफ काढून घ्यायची. घेवडा जरा मऊ झाला की ढवळायचा आणि झाकण काढून परतायचा. त्याला जरा पाणी सुटले की त्यात मीठ घालायचे. हळद घालायची आणि लाल तिखट घालायची.
४. लाल तिखट घालून झाल्यावर थोडा गूळ घालायचा. गुळामुळे भाजीला एक वेगळी चव येते. त्यात उकडलेले शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणेही मस्त परतायचे. धणे पूड घालायची भाजी घट्ट होऊ द्यायची. जास्तच कोरडी वाटत असेल तर थोडे पाणी घालायचे. जास्त पाणी घालू नका अगदी मसाले शिजण्यापुरते पाणी घालायचे. शेवटी कोथिंबीर घालायची आणि भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची.