श्रावण म्हणजे उपासाचा महिना. सोमवार, शनिवार फक्त उपासाचे पदार्थ अनेक जण खातात. मात्र तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा तर नक्कीच येतो. (Shravan Special: Make quick potato dish, crispy potato pancakes, Monday fasting recipes, easy and tasty food )अशावेळी छान वेगवेगळे पदार्थ करुन पाहण्यात खरी गम्मत आहे. साध्या सोप्या रेसिपी फार चविष्ट असतील तर एखाद्या सोमवारी करायलाच हव्यात. अशीच मस्त आणि एकदम सोपी रेसिपी म्हणजे बटाट्याचे असे घावन किंवा पॅनकेक्स. फक्त मोजक्या पदार्थांमध्ये होणारा हा पदार्थ एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट आहे.
साहित्य
बटाटा, मीठ, तूप, तेल, हिरवी मिरची, जिरं, शेंगदाणे
कृती
१. बटाटे स्वच्छ धुवायचे. नंतर त्याची सालं काढून घ्यायची. थोडावेळ मीठाच्या पाण्यात ठेवायचे. म्हणजे स्वच्छही होतात आणि चवही येते. बटाटे किसून घ्यायचे. छान पातळ किसायचे. किसल्यावर एका खोलगट पातेल्यात घ्यायचे आणि त्यात मीठ घालायचे. हाताने चांगले मळून घ्यायचे. जास्तीचे पाणी काढून टाकायचे. बटाटा छान मळायचा. जरा मऊ आणि एकजीव करायचा.
२. एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचे. सगळीकडे छान पसरवायचे. मग बटाट्याचे गोळे तयार करायचे. जास्त मोठे करु नका. मध्यम आकाराचेच करायचे. ते गोळे पॅनवर ठेवायचे. जरा काही सेकंद ठेवायचे. मग चमच्याने त्यावर जोर देऊन त्याचा गोलाकार पराठा किंवा पॅनकेक जसा करतात तसा आकार करायचा. पातळ करु नका. जरा जाडसरच ठेवायचे.
३. दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. छान खमंग होतात. दोन्ही बाजू लालसर तपकिरी झाल्या की काढून घ्यायचे. फक्त बटाटा आणि मीठ वापरुन छान असा पदार्थ तयार केल्यावर त्यासोबत खायला मस्त चटणी करायची. त्यासाठी हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. शेंगदाणे जरा सोलून घ्यायचे. सालांसकट घेतले तरी चालेल. एका पॅनमध्ये किंवा कढीत थोडे तेल घ्यायचे. त्यावर हिरवी मिरची परतायची. तसेच शेंगदाणे परतायचे. छान खमंग परतायचे. त्यात थोडं जिरं घाला. मग त्याचे कुट तयार करुन घ्यायचे. कुटून करा किंवा मग मिक्सरमध्ये फिरवायचे. त्यात छान घट्ट आणि गोड असे दही घालायचे. ढवळून घ्यायचे. मग थोडे मीठ घालायचे छान एकजीव करायचे.