श्रावणात काही चमचमीत आणि चटाकेदार खावेसे वाटले की काय खावे असा प्रश्नच पडतो. खास म्हणजे चाटचे पदार्थ खायचे तर त्यात कांदा आलाच. (Shravan Special Chaat, Make very easy Aloo Tikki-Special dish for the rainy season)मात्र कांदा न घालताही एकदम मस्त आलू टिक्की चाट करता येते. एकदम सोपी रेसिपी आहे. पाहा काय करायचे.
साहित्य
बटाटा, मीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लावर, लाल तिखट, हिरवी मिरची, जिरे, तेल, हळद , चिंच, गूळ, कोथिंबीर , आलं, पुदिना, दही
कृती
१. बटाटे उकडून घ्यायचे. बटाटे उकडून झाल्यावर त्याची सालं काढायची आणि बटाटे कुसरकरून घ्यायचे. बटाटे जरा जास्त घ्यायचे. कुसकरलेल्यानंतर त्यातील अर्धा बटाटा काढून घ्यायचा. त्यात तांदळाचे पीठ घालायचे आणि थोडे मीठ घालायचे. चमचाभर लाल तिखट घालायचे आणि पीठ मळून घ्यायचे. मस्त मऊ असे पीठ मळायचे.
२. चिंच भिजत घालायची. कोमट पाण्यात भिजवायची. म्हणजे लवकर मऊ होते. चिंच हाताने कुसकरायची. त्याचा अर्क काढून घ्यायचा, बिया आणि चोथा काढून टाका. उरलेला रस एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. गूळ घाला तसेच जिरे आणि कोथिंबीर घाला. आल्याचा तुकडा घाला तसेच थोडा पुदिना घाला आणि मिक्सरमधून चटणी वाटून घ्या.
३. चटणी जरा जाडसर घट्टच राहू दे. त्यात अगदी थोडेच पाणी घालयचे. अर्ध्या बटाट्यांचे पीठ मळून झाल्यावर उरलेल्या बटाट्याचे सारण तयार करायचे. त्यासाठी एका पॅनमध्ये चमचाभर तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात जिरे घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि मस्त फोडणी करायची. त्यात चमचाभर हळद घालायची. चवी पुरते मीठ घालायचे. कुसकरलेला बटाटा घालायचा. मिश्रण ढवळून घ्यायचे. छान परतायचे.
४. बटाट्याच्या भिजवलेल्या पिठाच्या लाट्या करुन घ्यायच्या. त्यात तयार केलेले बटाट्याचे सारण भरायचे. लाटी सगळीकडून व्यवस्थित बंद करायची. जरा हातानेच चेपायची. त्याला टिक्कीचा आकार द्यायचा. पॅनवर किंवा तव्यावर तेल घालायचे आणि त्यावर टिक्की खमंग होईपर्यंत दोन्ही बाजूंनी परतायची. छान कुरकुरीत झाली की काढून घ्यायची.
५. टिक्की मधोमध फोडायची त्यावर तयार केलेली चटणी घालायची. थोडे दही घालायचे एकदम मस्त होते. आणि चवीला भारी लागते.