शनिवारच्या किंवा सोमवारच्या उपासाला काय करणार ? अजून ठरवले नसेल तर हा पदार्थ खास तुमच्यासाठीच. अगदी सोपी रेसिपी आहे. चवीला जरा वेगळी आहे आणि अगदी मोजक्या पदार्थांत करता येते. (Shravan Food: make kadhi for vrat, easy and tasty recipe, must try food recipes, Shravan Special )कढी हा प्रकार भारतात फार आवडीने खाल्ला जातो. भातासोबत किंवा मग नुसतीच वाट्याभरुन कढी प्यायची. कढी अगदीच साधा पदार्थ आहे मात्र तेवढाच मनाला समाधान देणाराही आहे. उपासाला जर कढी प्यायला मिळाली तर? वरीचा भात आणि त्यावर गरमागरम उपासाची कढी म्हणजे आहाहाहा!! पाहा अगदी साधी रेसिपी.
साहित्य
दही, मीठ, जिरं, हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कुट, तूप, पाणी(जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही घ्या)
कृती
१. छान ताजे गोडसर दही घ्यायचे. दह्यात थोडे पाणी घालायचे आणि दही घुसळून घ्यायचे. मस्त जरा घट्ट असे ताक करायचे. अति पातळ ताक करु नका. कारण या कढीसाठी आपण बेसनाचे पीठ घेत नाही. त्यामुळे कढीला घट्टपणा जास्त येणार नाही. ताक जरा घट्ट असेल तर कढी पाणचट लागणार नाही.
२. ताक करुन झाल्यावर त्यात दोन चमचे शेंगदाण्याचे कुट घालायचे. अति घालू नका. थोडेसेच घ्यायचे. ताक आणि शेंगदाण्याचे कुट मस्त ढवळून घ्यायचे. त्यात चमचाभर मीठ घालायचे आणि मिश्रण छान ढवळून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. कमी तिखट मिरची वापरा आणि चांगल्या चार ते पाच मिरच्या घ्या.
३. एका खोलगट पातेल्यात चमचाभर तूप घ्यायचे. तूप मस्त गरम झाल्यावर त्यात चांगले दोन चमचे जिरे घालायचे. जिरे खमंग परतायचे. जिरं फुलल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. हिरवी मिरची परतायची. गॅस मंद ठेवायचा. म्हणजे मिरची करपणार नाही. हिरवी मिरची परतून झाल्यावर अगदी चमचाभर दाण्याचे कुट परतायचे. छान खमंग परतायचे.
४. सागळे पदार्थ परतून झाल्यावर त्यात तयार केलेले ताक आणि शेंगदाण्याच्या कुटाचे मिश्रण ओतायचे. व्यवस्थित ढवळायचे. त्याला उकळी येईपर्यंत ढवळायचे. म्हणजे कढी फुटत नाही. छान एकजीव होते. कढी उकळल्यावर जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर मस्त बारीक चिरुन घालायचे. अनेक जण कोथिंबीर खात नाहीत मात्र काही ठिकाणी खाल्ली जाते.