पराठा हा पदार्थ घरोघरी केला जातो. अनेक प्रकारचे पराठे केले जातात. असाच एक प्रकार उपासालाही करता येतो. (Shravan Food: If you are fasting, eat this delicious, soft, fasting paratha, easy recipes)साबुदाण्याच्या पिठाचे पराठे करता येतात. एकदम खमंग , खुसखुशीत आणि मऊ होतात. एकदम मस्त पदार्थ आहे. एकदा नक्कीच खाऊन पाहायला हवा. करायला फार कष्ट नाहीत. पाहा कसा करायचा. उपासाचा पराठा.
साहित्यसाबुदाणा, बटाटा, तूप, पाणी, मीठ, हिरवी मिरची, जिरे
कृती१. अगदी सोपी आणि मस्त रेसिपी आहे फक्त साबुदाण्याचे पीठ छान सरसरीत होईल याची काळजी घ्यायची. बाकी करायला काहीच कष्ट नाहीत. एका पॅनमध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा. वाटीभर साबुदाणा घेत असाल दोन बटाटे घ्यायचे. तुम्हाला किती पराठे करायचे आहेत त्यानुसार साबुदाणा घ्या.
२. पाच ते दहा मिनिटे साबुदाणा परतायचा. छान कुरकुरीत होतो. मग काढून एका ताटलीत ठेवायचा. जरा गार करायचा. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि त्याचे पीठ तयार करायचे. जास्त वाटायचे नाही जरा बटण चालूबंद करत वाटून घ्यायचे म्हणजे छान सरसरीत पीठ होते.
३. बटाटे उकडून घ्यायचे. बटाटे उकडल्यावर ते गार करायचे आणि मग त्याची सालं काढून घ्यायची. बटाटा किसायचा. हाताने फक्त कुसकरलेल्या बटाट्याचे छान एकजीव असे पीठ मळता येत नाही. त्यामुळे बटाटा किसूनच घ्यायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. साबुदाण्याच्या पिठात किसलेला बटाटा घालायचा. तसेच हिरव्या मिरचीते तुकडे घालायचे आणि चवी पुरते मीठ घालायचे. तसेच जिरे घालायचे. पीठ मस्त एकजीव मळून घ्यायचे.
४. पीठ मळताना त्यात थोडे तूप घालायचे. तसेच थोडे पाणी घालायचे आणि पीठ मळायचे. मस्त मऊसर पीठ मळायचे. हाताला थोडे पाणी लावायचे आणि पीठाच्या गोल लाट्या तयार करायच्या. लाट्या साबुदाण्याच्या पिठात घोळवाच्या आणि लाटून घ्यायच्या. छान गोलाकार पराठे लाटायचे.
५. गॅसवर तवा तापत ठेवायचा. तवा तापल्यावर त्यावर पराठा लावायचा आणि परतून घ्यायचा. तूप लावायचे आणि खमंग परतायचा. दोन्ही बाजूंनी जरा कुरकुरीत परतून घ्यायचा. दह्याशी किंवा उपासाच्या चटणीशी खायचे.