Right Way To Eat Apple : आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांची गरज असते. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे काही खातो, त्यातून शरीराला विविध पोषक तत्त्वे मिळतात आणि आपण निरोगी राहतो. रोजच्या आहारात चपाती-भाजी किंवा डाळ-भात याबरोबरच वेगवेगळी फळं खाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच बरेच लोक दररोज फळे खाण्याची सवय ठेवतात. सफरचंद हे असंच एक फळ आहे, जे खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सफरचंद योग्य प्रकारे कसं खावं? बहुतेक लोकांना हे ठाऊक नसतं की सफरचंद खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे, ज्यामुळे त्याचे सर्वाधिक फायदे मिळू शकतात.
बऱ्याच लोकांना फळं खाण्याबाबत कन्फ्यूजन असतं. अनेकांना प्रश्न पडतो की, काही फळं सोलून खावीत सालीसकट? सफरचंद हे देखील असंच एक फळ आहे, जे बरेच लोक साल न काढता खातात. मात्र, वेट लॉस एक्सपर्ट सुधीर आष्ट यांचं याबद्दल वेगळं मत आहे. त्यांच्या मते, खाण्याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे.
सफरचंद कसं खावं?
वेट लॉस एक्सपर्ट सुधीर आष्ट यांनी सांगितलं आहे की सफरचंद नेहमी सोलून खावं. त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, 'निसर्गान प्रत्येक गोष्टीसाठी एक संरक्षणात्मक थर दिलेला आहे, ज्यामुळे बाहेरील दूषित घटक फळाच्या आत किंवा बिजांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. काही फळं मात्र सालीसकटच खावी लागतात, जसं की द्राक्षं. पण सफरचंदाचं साल काढून खाणं जास्त योग्य ठरतं'.
काही लोक म्हणतात की सालीत पोषक तत्त्वे असतात, पण मग ते आंबा किंवा केळं सालीसकट का खात नाहीत? त्यामुळे नेहमी फळांचा गर खाणं अधिक योग्य आहे.
सफरचंदाचे फायदे
आपण ती म्हण ऐकलीच असेल की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. सफरचंदात फायबर, व्हिटामिन C, पोटॅशियम आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात. ही सगळी पोषक तत्त्वे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज एक सफरचंद खाण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.