पुरणपोळी हा महाराष्ट्रीयन लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. प्रत्येक सणावाराला, मंगलप्रसंगी महाराष्ट्रात पुरणपोळी केलीच जाते. पण तरीही दरवेळी पुरणपोळी खाऊनही तिचा कंटाळा येत नाही. प्रत्येकवेळी तेवढ्याच ओढीने तिची चव हवीहवीशी वाटते. आता रेणुका शहाणे या मराठी अभिनेत्री.. त्यामुळे त्यांच्या घरीही पुरणपोळी आवडीने खाल्ली जायची. पण ती खूप वेगळ्या पद्धतीने तयार केलेली (instant puran poli recipe). याविषयी माहिती सांगणारा रेणुका शहाणेंचा एक व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी अगदी झटपट होणाऱ्या शॉर्टकट पुरणपोळीची रेसिपी सांगितली आहे.(Shortcut Puran Poli Recipe by Renuka Shahane)
शॉर्टकट पुरणपोळीची रेणुका शहाणे स्पेशल रेसिपी
आता पुरणपोळी करायची असते तेव्हा आपण हरबरा डाळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घेतो आणि नंतर जेवढी डाळ असेल तिच्या दुप्पट पाणी घालून ती शिजवून घेताे. यानंतर डाळीतलं जास्तीचं पाणी काढून टाकतो.
नंतर ती कढईमध्ये काढून घेतो. तिच्यामध्ये गूळ किंवा साखर घालून पुरणाला चटका देतो आणि मग ते पुरण यंत्रातून काढतो. एवढी सगळी प्रक्रिया केल्यानंतर जे पुरण तयार होतं त्याच्या आपण पुरणपोळ्या करतो. या सगळ्या गोष्टींना खूप वेळ आणि मेहनत लागते.
म्हणूनच यावर रेणुकाजींनी एक तोडगा शोधून काढला आहे. त्या हरबरा डाळ अगदी मोजकं पाणी घालून कुकरमध्ये शिजायला घालतात. त्याचवेळी त्यामध्ये गूळ किंवा साखर, वेलची, जायफळ घालतात आणि सगळं एकदम शिजवून घेतात. डाळ शिजल्यानंतर जास्तीचं पाणी काढून टाकायचं.
केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करणारे ४ प्रकारचे आयुर्वेदिक तेल, बघा कसे आणि केव्हा लावायचे...
शिजलेली डाळ मॅश करायची आणि मग त्याचीच पुरणपोळी करायची. आता यात थोडा बदल हवा असेल तर तुम्ही मॅश केलेल्या डाळीला कढईत घालून चटकाही देऊ शकता. लवकरच येणाऱ्या पुढच्या सणाला या पद्धतीने थोडंसं पुरण शिजवून पाहायला हरकत नाही. या व्हिडिओला चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जणांच्या मते पुरणपोळी करण्याची ही खूप सोपी ट्रिक असून काही जण म्हणत आहेत की या पद्धतीने पुरणपोळी होऊच शकत नाही. म्हणूनच आपली आपण ही रेसिपी ट्राय करून पाहाणे आणि स्वत: अनुभव घेणेच जास्त योग्य..
