शेवग्याला आयुर्वेदात 'सुपरफूड' मानलं जातं. कॅल्शियम, प्रोटीन आणि मिनरल्सचा खजिना असलेल्या या शेंगा आरोग्यासाठी जितक्या गुणकारी आहेत, तितक्याच चवीलाही भारी लागतात. शेवग्याच्या शेंगा म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती वाफाळलेली आमटी किंवा रस्सा भाजी. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त असलेल्या शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. पण नेहमी तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर शेवग्याच्या शेंगांचे 'भरीत' हा एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. वांग्याच्या भरीतालाही मागे टाकेल अशी याची चव आणि बनवण्याची सोपी पद्धत यामुळे हे भरीत घराघरांत आवडीने खाल्ले जाते. विशेषतः बाजरीची भाकरी किंवा गरम पोळीसोबत या भरताची चव अधिकच खुलते. उकडलेल्या शेंगांचा मऊ गर आणि खमंग फोडणी यांचा मेळ बसला की जेवणाची रंगत द्विगुणित होते. ज्यांना शेंगा खायला आवडत नाहीत, ते देखील हे भरीत आवडीने चाखून पुसून खातील, इतकी याची चव लाजवाब असते(How To Make Drumstick Bharta At Home).
मराठमोळ्या जेवणात भरीत हा पदार्थ खास मानला जातो, आणि जर तो शेवग्याच्या शेंगांचं (Shevgyachya Shengancha Bharit Recipe) असेल तर चव आणि पौष्टिकता दोन्ही दुप्पट होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असतं, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. गरमागरम बाजरीची भाकरी, त्यावर थोडं लोणी आणि सोबतीला शेवग्याच्या शेंगांचं खमंग भरीत... हा विचार करूनच तोंडाला पाणी सुटतं...वांग्याचं भरीत तर आपण आवडीने खातोच, पण एकदा शेवग्याच्या शेंगांचं हे मराठमोळं भरीत बनवून पाहा. कमीत कमी तेल आणि मसाल्यात तयार होणारं हे भरीत तुमच्या रोजच्या जेवणाला एक वेगळीच गावरान (Drumstick Bharta Recipe) लज्जत देईल. शेवग्याच्या शेंगांच भरीत करण्याची साधीसोपी रेसिपी पाहा.
साहित्य :-
१. शेवग्याच्या शेंगा - ३ ते ४ २. तेल - २ ते ३ टेबलस्पून ३. लसूण पाकळ्या - ६ ते ८ पाकळ्या४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४५. लाल सुक्या मिरच्या - ३ ते ४६. कांदा - १ कप ७. टोमॅटो - मध्यम आकाराचे८. कडीपत्ता - ६ ते ७ पाने ९. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
कृती :-
१. सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. कुकरमध्ये पाणी घालून चवीनुसार थोडं मीठ घालून या शेंगा २ शिट्ट्या काढून वाफवून घ्याव्यात. २. शेवग्याच्या शेंगा वाफवून झाल्यावर त्या सुरीने बरोबर मध्यभागी कापून त्यातील गर काढून घ्यावा. शेंगाचा गर काढून झाल्यावर पॅनमध्ये थोडं तेल घेऊन तो गर २ ते ३ मिनिटे तेलावर हलकेच परतून घ्यावा.
अस्सल गावरान चवीचं, भरपूर कांदा घातलेलं 'इन्स्टंट कांद्याचं थालीपीठ' कसं करायचं, पाहा रेसिपी...
२. पॅनमधील तेलात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, लाल काश्मिरी सुक्या मिरच्या असे सगळे जिन्नस एकत्रित परतून घ्यावं. मग याच तेलात कांदा आणि टोमॅटो देखील हलकेच २ ते ३ मिनिटे परतून व्यवस्थित शिजवून घ्यावा. (टोमॅटो शिजल्यावर त्याची सालं काढावीत.) मग तेलात कडीपत्ता देखील परतून घ्यावा. ३. एका बाऊलमध्ये, शेवग्याच्या शेंगांचा गर, भाजून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि हिरव्या लाल मिरच्या व लसूण पाकळ्या असे सगळे तेलात परतवून घेतलेले जिन्नस एकत्रित करावेत. हाताने हलकेच दाब देत सगळे जिन्नस बारीक करून घ्यावेत. ४. सगळे जिन्नस बारीक करून झाल्यावर वरून चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर घालावी.
चमचमीत, झणझणीत आणि तितकेच पौष्टिक असे शेवग्याच्या शेंगांचे भरीत खाण्यासाठी तयार आहे. हे भरीत आपण भाकरी, चपाती किंवा अगदी वाफाळलेल्या भातासोबत देखील खाऊ शकता.
Web Summary : Discover the superfood drumstick in this bharta recipe! Packed with nutrients, it's a tasty alternative to traditional eggplant bharta. Enjoy this simple, village-style dish with bajra roti or warm chapati for a flavorful, healthy meal.
Web Summary : इस भरता रेसिपी में सुपरफूड सहजन का पता लगाएं! पोषक तत्वों से भरपूर, यह पारंपरिक बैंगन भरता का एक स्वादिष्ट विकल्प है। एक स्वादिष्ट, स्वस्थ भोजन के लिए बाजरा रोटी या गर्म चपाती के साथ इस सरल, गांव-शैली के व्यंजन का आनंद लें।