पावसाळ्यात, थंडीत किंवा कधी तरी संध्याकाळच्यावेळी भूक लागते अशा वेळी गरमागरम कुरकुरीत भजी समोर आली, तर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. विविध प्रकारच्या भजी करता येतात. कांदा,बटाटा आपण नेहमीच खातो. (See the recipe for making spicy bhaji varieties, make pakoda this way)मात्र काही भजी असतात ज्या फार लोकं करत नाहीत जसे की पालक भजी, कोबी भजी आणि सिमला मिरचीची भजी. या तीनही भजी चवीला एकदम मस्त लागतात. तसेच करायलाही सोप्या असतात. पण काही वेळा या मऊ पडतात किंवा काहीतरी फसते. भजी करताना काही टिप्स लक्षात ठेवा आणि एकदम मस्त अशी भजी तळा.
भजी करताना पीठ हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भजीसाठी बेसन वापरलं जातं, पण त्यासोबत जर थोडंसं तांदळाचं पीठ मिसळलं, तर भजी जास्त कुरकुरीत होतात. ज्यामुळे टेक्सचर अजून छान येईल. बेसन थोडं भाजून वापरल्यास त्याचा स्वाद अधिक खुलतो. पिठाचे प्रमाण भाज्यांच्या प्रमाणानुसार संतुलित असावे. फार जास्त पीठ भजीला जाडसर आणि गिळगिळीत करु शकतं. तर खूपच कमी पिठामुळे भजी पसरलेली आणि तेलकट होते.
पालक भजी करताना, पालकाची पानं स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडी करणे आवश्यक असते. पानांवर पाणी राहिलं, तर पीठ चिकटत नाही आणि भजी तळताना तेल उडण्याची शक्यता असते. पालक खूप बारीक चिरण्याऐवजी थोडा जाडसर चिरायचा. यामुळे भजीचा आकार चांगला येतो आणि चवही जास्त चांगली लागते.
कोबीच्या भजीसाठी, कोबी बारीक चिरायचा. चिरताना पाण्यात फार वेळ न भिजवता फक्त धुऊन लगेच निथळावायचा. सिमला मिरचीसुद्धा अगदी बारीक किंवा फार जाड न कापता मध्यम आकारात चिरावी. सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करायचे.
भजीचे मिश्रण करताना त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडी हळद, हिंग, तिखट, मीठ आणि जिरे घाला. कोथिंबीर घातल्याने सुगंध आणि चव दोन्ही जास्त छान लागेल. काहीजण लिंबाचा रस किंवा अर्धा चमचा आमचूर पावडरही घालतात. त्यामुळे भजीला हलकीशी आंबटसर चव येते. भजी हा प्रकार कसाही केला तरी चविष्टच होतो मात्र काही साध्या टिप्स लक्षात ठेवल्याने त्याची चव आणखी छान करता येते. मस्त वातावरणात चहासोबत भजीचे तेच-तेच प्रकार खाण्यापेक्षा काहीतरी वेगळे खाऊन पाहा. नक्की आवडेल.