Join us

पोटभरीचा आणि पोटाला थंडावा देणारा सत्तूचा पराठा; उन्हाळ्यात नाश्त्यासाठी पारंपरिक पौष्टिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 19:03 IST

सत्तू चविष्टपणे खाण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे सत्तूचे पराठे. करायला एकदम सोपे, ही घ्या रेसिपी

ठळक मुद्देगव्हाच्या पिठात सत्तूचं सारण भरुन पराठा केला जातो. 

उन्हाळ्याच्या दिवसात आहारात  सत्तूचा  अवश्य समावेश करावा. सत्तू, सत्तूचे  पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. भारतात बिहार राज्यात उन्हाळ्याच्या दिवसात सत्तूचे विविध पदार्थ केले जातात. यात सत्तूचं सरबत, सत्तूची लिट्टी आणि सत्तूचे पराठेही केले जातात. सत्तूत गुळाचं पाणी घालून पेजेसारखं सत्तू खाल्ला जातो. पण सत्तू चविष्टपणे खाण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे सत्तूचे पराठे.

कसे करायचे सत्तूचे पराठे?

सत्तूचे पराठे करण्यासाठी 3 कप गव्हाचं पीठ, 2 कप सत्तू, 2 बारीक कापलेले कांदे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 लहान चमचा किसलेलं आलं, अर्धा छोटा चमचा ओवा, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, चिरलेली कोथिंबीर,  2 चमचे साजूक तूप,पराठे भाजण्यासाठी तेल किंवा तूप आणि चवीपुरती मीठ घ्यावं. 

Image: Google

सत्तूचे पराठे करताना गव्हाचं पीठ घ्यावं. पिठात तूप आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावं. पीठ खूप सैल मळू नये. थोड्या वेळ पीठ मुरु द्यावं. तोपर्यंत पराठ्याचं सारण करावं. यासाठी एका मोठ्या भांड्यात सत्तू घ्यावा. त्यात लसणाची पेस्ट, किसलेलं आलं, कांदा, लिंबाचा रस , आमचूर पावडर, चिरलेली कोथिंबीर, ओवा आणि मीठ घालून सर्व नीट मिसळून घ्यावं. या मिश्रणात 2 चमचे पाणी घालून मिश्रण नीट हलवून घ्यावं. 

Image: Google

पराठ्यासाठीचं पीठ मळून पुन्हा सेट करुन घ्यावं.  पिठाच्या छोट्या लाट्या घेऊन त्या पुरी एवढ्या लाटाव्यात. पुरीमध्ये सत्तूचं सारण भरावं. पुरी चारही बाजूनं बंद करुन पराठा हलक्या हातानं लाटून घ्यावा. गरम तव्यावर पराठे दोन्ही बाजुंनी तेल किंवा तूप घालून खरपूस भाजून घ्यावेत. उन्हाळ्याच्या दिवसात सत्तूचे पराठे दही, कैरीचं ताजं लोणचं किंवा कैरीच्या चटणीसोबत छान लागतात. 

टॅग्स :अन्नआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती